esakal | पुणे-लखनौ एक्‍स्प्रेसमध्ये पोलिसांकडूनच प्रवाशांची लूट
sakal

बोलून बातमी शोधा

Pune-police.jpg

पुणे-लखनौ एक्‍स्प्रेसमधील प्रवाशांकडून बळजबरीने चौदाशे रुपये उकळणाऱ्या गस्त पथकातील लोहमार्ग पोलिसांविरुद्ध वरिष्ठ रेल्वे तिकीट परीक्षकाने तक्रार देऊनदेखील संबंधितांवर कारवाई झाली नाही. कारवाई करण्याऐवजी संबंधित प्रवाशांवर एक्‍स्प्रेसमध्ये सिगारेट ओढल्याचा बनाव करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

पुणे-लखनौ एक्‍स्प्रेसमध्ये पोलिसांकडूनच प्रवाशांची लूट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दौंड : पुणे-लखनौ एक्‍स्प्रेसमधील प्रवाशांकडून बळजबरीने चौदाशे रुपये उकळणाऱ्या गस्त पथकातील लोहमार्ग पोलिसांविरुद्ध वरिष्ठ रेल्वे तिकीट परीक्षकाने तक्रार देऊन देखील संबंधितांवर कारवाई झाली नाही. कारवाई करण्याऐवजी संबंधित प्रवाशांवर एक्‍स्प्रेसमध्ये सिगारेट ओढल्याचा बनाव करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

पुणे-लखनौ एक्‍स्प्रेसने शुक्रवारी (ता. 23) संध्याकाळी पुणे रेल्वेस्थानक सोडल्यावर गस्तीवरील सहा लोहमार्ग पोलिसांपैकी दोघांनी नवाज हबीब शरीफ (वय 26) या प्रवाशाला मारहाण केली. गणवेशातील रेल्वे पोलिस नाईक गणेश जी. राठोड व त्याच्या एका सहकार्याने नवाज यास फरफटत स्वच्छतागृहाकडे ओढत नेले. तेथे नवाज याच्या मोबाईल फोनमध्ये अश्‍लील चित्रफीत असल्याचे सांगून कारवाई न करण्यासाठी बळजबरीने खिशातील चौदाशे रुपये काढून घेतले. सहप्रवाशांनी याची माहिती एक्‍स्प्रेसमधील तिकीट परीक्षकांनी दिली. त्यांनी याची माहिती वरिष्ठांना दिली. एक्‍स्प्रेस दौंड रेल्वेस्थानकावर दाखल होताच संबंधित प्रवासी, लोहमार्ग पोलिस व तिकीट परीक्षक रेल्वे स्थानक व्यवस्थापक कार्यालयात आले व त्यापैकी तिकीट परीक्षकांनी तक्रारपुस्तिकेत तक्रार नोंदविली. वरिष्ठ तिकीट परीक्षक शैलेश कुमार यांनी लोहमार्ग पोलिस जबरदस्तीने प्रवाशांकडून पैसे काढत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. ही तक्रार दौंड लोहमार्ग पोलिसांकडे तपासासाठी वर्ग करण्यात आली. 

संबंधित प्रवासी हा सिगारेट ओढत होता, असा दावा गणेश राठोड याने लोहमार्ग पोलिसांकडे नोंदविलेल्या जबाबात केला आहे. रेल्वेच्या जबाबदार अधिकाऱ्याने तक्रार दिल्यानंतरही त्याची दखल न घेता पैसे लुटणाऱ्या पोलिसाला वाचविण्यासाठी काही वरिष्ठांनी हस्तक्षेप केल्याने या प्रकरणात कोणतीही कारवाई झाली नाही. 

प्रवाशाच्या तक्रारीनंतर कारवाई होणार 
याबाबत दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या निरीक्षक दीपाली भुजबळ यांना आज विचारले असता त्या म्हणाल्या, "याबाबत तक्रार प्राप्त झाली आहे व चौकशी सुरू आहे. संबंधित प्रवाशांशी मोबाईलवरून संपर्क साधला असता त्यांनी 10 ते 15 दिवसांनी परत येणार असल्याचे सांगितले असून, त्यांची स्वतंत्र तक्रार प्राप्त होताच चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल.'' 

loading image
go to top