esakal | खंडणी प्रकरणात "पोलिसमित्र' कासटला कोठडी 
sakal

बोलून बातमी शोधा

खंडणी प्रकरणात "पोलिसमित्र' कासटला कोठडी 

खंडणी प्रकरणात पोलिसांनी अटक केलेला "पोलिसमित्र' जयेश भगवानदास कासट (वय 42, रा. एरंडवणे) याला न्यायालयाने मंगळवारपर्यंत (ता. 18) पोलिस कोठडी सुनावली आहे.

खंडणी प्रकरणात "पोलिसमित्र' कासटला कोठडी 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - खंडणी प्रकरणात पोलिसांनी अटक केलेला "पोलिसमित्र' जयेश भगवानदास कासट (वय 42, रा. एरंडवणे) याला न्यायालयाने मंगळवारपर्यंत (ता. 18) पोलिस कोठडी सुनावली आहे. शहरातील एका डॉक्‍टरकडून खंडणी उकळल्याच्या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कासट याच्याविरुद्ध डॉ. हेमंत अडसूळ (वय 55, रा. सहकारनगर) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून शनिवारी (ता. 15) रात्री त्याला अटक करण्यात आली. फिर्यादीचा भाऊ मनोज अडसूळ याने डॉ. दीपक रासने यांच्या मुलाला विनयभंग, ऍट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून 75 लाख रुपये घेतले होते. त्यात डॉ. रासने यांच्याकडून मध्यस्थ म्हणून कासट याने अडसूळला पोलिस व पत्रकारांची ओळख असल्याचे सांगून व खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पाच लाख रुपये घेतले होते. तसेच, उर्वरित 70 लाखांची मागणी करीत होता. पैसे घेतल्याबाबत त्याने डॉ. रासने यांना सांगितले नव्हते. याप्रकरणी प्रारंभी मनोज अडसूळने पोलिसांकडे खंडणीची तक्रार दिली होती. पोलिसांच्या तपासात अडसूळनेच खंडणी उकळल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर डॉ. अडसूळ याने शनिवारी कासटविरुद्ध फिर्याद दिली. त्यानंतर खंडणी व अमली पदार्थविरोधी पथकाने कासटला अटक केली. 

आणखी वाचा - इंदुरीकर महाराजांवरील टीकेवरून तृप्ती देसाईला इशारा

दरम्यान, पोलिसांनी कासटला रविवारी न्यायालयात हजर केले. त्याने अडसूळकडून घेतलेली पाच लाखांची खंडणीची रक्कम जप्त करायची आहे, तसेच या प्रकरणात त्याचे आणखी कोण साथीदार आहेत का, यादृष्टीने तपास करायचा आहे, त्यासाठी पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्यास मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. फिर्यादीतर्फे ऍड. विजयसिंह ठोंबरे यांनी बाजू मांडली. या प्रकरणाचा तपास खंडणी व अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड करीत आहेत. 

loading image