

कऱ्हाडला उड्डाणपुलावरील
वाढदिवसाची रील चर्चेत
महिला पोलिसाने चक्क महामार्गावरच सिनेस्टाईल कापला केक
कऱ्हाड, ता. १ ः राष्ट्रीय महामार्गावर येथील कोल्हापूर नाक्यावर नव्याने झालेल्या उड्डाणपुलावर काही दिवसांपूर्वीच अपघातात चौघांचा मृत्यू झाला. त्याच उड्डाणपुलावर महिला हवालदाराने नवी कोरी मोटार थांबवून वाढदिवस साजरा केलेली रील समाज माध्यमावर व्हायरल झाली आहे. वाढदिवस साजरा करताना महामार्गावरच मोटार लावलेली दिसून येत असून, त्याच्या बोनेटवर केक कापला जात आहे. मोटारीसमोर वेगवेगळ्या पोझमध्ये संबंधित महिला वावरत असल्याचेही त्यात दिसते, तसेच हातात फायर गन घेऊन त्यातून ठिणग्याही उडवल्या जात आहे. रात्रीच्या वेळी झालेल्या या महिला पोलिसाच्या वाढदिवसाची सध्या जोरदार चर्चा आहे.
कोल्हापूर नाका ते नांदलापूर या साडेतीन किलोमीटरच्या लांबीचा उड्डाणपूल सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वीच हा पूल खुला झाला. प्रशस्त रस्ता असल्याने त्यावर मोटारीसाठी प्रतितास १०० किलोमीटर तर अन्य वाहनांसाठी ८० किलोमीटर वेग मर्यादा ठेवलेली आहे. त्यामुळे पुलावर भरधाव वाहनांमुळे अपघातही होत आहेत. दसऱ्या दिवशीच वेगाने आलेल्या मोटार अपघातात चौघे ठार झाले. त्या पुलावर संबंधित महिला पोलिस महामार्गावर वाढदिवस साजरा केल्याची रील व्हायरल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. सामान्यांनी अशा पद्धतीने रस्त्यावर वाढदिवस केल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाते. गुन्हेही दाखल करतात. मात्र, आता महिला पोलिसानेच थेट महामार्गावरच वाढदिवस साजरा केल्याने पोलिसांची भूमिका काय राहणार? याकडे लक्ष लागून आहे.
.....................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.