साताऱ्यात पोलीस पाटीलांचा भत्त्यासाठी एल्गार १५ दिवसांत निवडणूक भत्ता न दिल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा
निवडणूक भत्ता देण्याची पोलिस पाटलांची मागणी
आनेवाडी, ता. २४ : जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती २०२५ च्या पंचवार्षिक निवडणुकीत कर्तव्य बजावलेल्या पोलिस पाटलांना प्रशासकीय निवडणूक भत्ता तत्काळ अदा करावा, अन्यथा १५ दिवसांनंतर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा सातारा जिल्हा पोलिस पाटील संघटनेने दिला आहे.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुहास भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की निवडणुकीदरम्यान गावपातळीवर प्रशासनाचा शेवटचा दुवा म्हणून पोलिस पाटील काम करत असते. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान ६ व ७ फेब्रुवारीला मतदान साहित्याची सुरक्षित वाहतूक, मतदान केंद्रांवरील कायदा व सुव्यवस्था राखणे, प्रशासकीय व पोलिस अधिकाऱ्यांना सहकार्य करणे ही सर्व कामे प्रामाणिकपणे पार पाडण्यात आली. आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून ते संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत गावकामगार तलाठी, ग्रामसेवक व संबंधित पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी यांच्या समन्वयाने गावात शांतता राखण्यात पोलिस पाटलांनी महत्त्वाची भूमिका बजावली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांचे काटेकोर पालन करून कोणताही अनुचित प्रकार घडू न देता कायद्याचा आदर राखण्यात आला. मात्र, एवढी जबाबदारी पार पाडूनही निवडणूक भत्त्याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.
मागील पंचवार्षिक निवडणुकीवेळी काही तालुक्यांत भत्त्यासाठी निवेदने द्यावी लागली होती. त्यावेळी काहींना भत्ता मिळाला, तर काहींना मिळाला नाही, अशी विसंगती आढळून आली होती. त्यामुळे यंदा सर्व पात्र पोलिस पाटलांना निवेदन प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांच्या आत प्रशासकीय भत्ता अदा करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, १४ मार्च २०१७ ला पोलिस पाटील यांना निवडणूक भत्ता अदा करण्याबाबत शासनाने काढलेल्या आदेशाची प्रत निवेदनासोबत जोडण्यात आल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
02400
सातारा : निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना निवेदन देताना जिल्हाध्यक्ष सुहास भोसले पाटील, विलास माने व राजू रामुगडे उपस्थित. (प्रशांत गुजर ः सकाळ छायाचित्रसेवा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

