असा चालतोय डिजिटल मटका...व्हाॅट्सअपवर आकडा लावा, गुगल पेवर पैसे भरा

हितेंद्र गद्रे
Friday, 7 August 2020

दौंड तालुक्यातील यवत येथे भाड्याच्या खोलीत व्हाॅट्सअॅपद्वारे सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल छापा मारला.

यवत (पुणे) : दौंड तालुक्यातील यवत येथे भाड्याच्या खोलीत व्हाॅट्सअॅपद्वारे सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल छापा मारला. या वेळी साडेपाच लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला असून, तीन जणांना अटक करण्यात आली आहे.  

आळंदीत चोर पावलांनी वशिल्याचे माउली दर्शन

यवत येथील सहकार नगरमधील भाड्याच्या खोलीत व्हाट्सअॅपद्वारे मटका अड्डा सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने यवत पोलिसांच्या सहकाऱ्याने संबंधित ठिकाणी काल सायंकाळी छापा टाकला. या वेळी आरोपी व्हाॅट्सअॅपच्या मदतीने मटक्याचे आकडे घेऊन गुगल पेच्या मदतीने पैसे घेत असल्याचे निदर्शनास आले. कल्याण मटका जुगाराची साधने, चार हजार पाचशेची रोकड व स्कॉडा कार (क्र. एम एच 43 एबी 7829), असा मिळून सुमारे साडेपाच लाखांचा ऐवज या वेळी जप्त करण्यात आला. 

या विद्यार्थ्यांसाठी आहे लष्करात संधी

तसेच, या छाप्यावेळी दत्तात्रेय दशरथ चव्हाण (वय 36, रा. कातरखडक ता. मुळशी), अतिश अंकुश जाधव (वय 22, रा. गोणसवाडी ता. चिपळूण जि. रत्नागिरी), संदिप उर्फ धर्मा बबन चव्हाण (वय 35, रा. भोर), जितेंद्र पंढरीनाथ चव्हाण (वय 32, रा. सहकार नगर, यवत, ता. दौंड) यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर धनवट यांनी दिली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मटक्याचा व्हाॅट्सअॅपवरून घेतलेला खेळ हा सातारा येथील समीर शेख याच्या व्हाॅट्सअॅपवर पाठवला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. शेख य़ाच्याह पाच आरोपींविरूद्ध मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रेय गुंड यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करणाऱ्या पथकामाध्ये महेश गायकवाड, नीलेश कदम, सुभाष राऊत, गुरू गायकवाड व यवत पोलिस स्टेशनचे हवालदार शैलेश लोखंडे व संतोष पंडीत यांचा समावेश होता. यवतचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील हे पुढील तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police raids Matka bases in Daund taluka