महासंचालक न आल्याने पिंपरी पोलिस अधिकाऱ्यांची निराशा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

पिंपरी : मोठे साहेब येणार म्हणून पोलिस आयुक्तालयासह ठाण्यांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांची गेल्या आठ दिवसांपासून धावपळ सुरू होती. रेकॉर्ड अपडेट करण्यासह साहेबांसमोर गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले प्रश्‍न मांडता येतील व त्यांच्याकडून प्रश्‍न सुटल्यास आयुक्तालयाचा गाडा सुरळीत चालू लागेल, अशी अधिकाऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, त्यांच्या पदरी निराशाच पडली. पुण्यातील महाराष्ट्र पोलिस दलाच्या दूरस्थ प्रशिक्षण केंद्राचे उद्‌घाटन करून आयुक्तालयात न येता ते थेट मुंबईला रवाना झाले.
 
प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनासाठी बुधवारी (ता. 28) पुण्यात आलेले राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयालाही भेट देणार होते. त्याचे नियोजन आठ दिवसांपूर्वीच झाले होते. त्यापाठोपाठ आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी तयारी सुरू केली होती. सर्व पोलिस ठाण्यांकडून माहिती मागवून रेकॉर्ड अपडेट करण्यात येत होते.

महासंचालकांसमोर आयुक्तालयासाठी आवश्‍यक असणारे मनुष्यबळ, वाहने, निधी आदी मुद्दे मांडायचे याची यादीही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तयार केली होती. मात्र, महासंचालक पुण्यातील कार्यक्रम उरकून थेट मुंबईकडे रवाना झाल्याने सर्व अधिकाऱ्यांचा हिरमोड झाला. किंबहुना, आयुक्तालयाचे प्रश्‍न आणखी लांबणीवर पडणार, याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. 

अधिकाऱ्यांची दमछाक 
कर्मचारी व वाहनांच्या अपुऱ्या संख्येमुळे आयुक्तालयाला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. अडचणींशी तोंडमिळवणी करताना अधिकाऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. त्याबाबत त्यांनी वेळोवेळी पाठपुरावाही केला आहे. मात्र, हवी तितकी यंत्रणा उपलब्ध झालेली नाही. 

नेमके काय झाले? 
पुण्यातील कार्यक्रमानंतर पोलिस महासंचालक पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात येणार होते. त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज होत्या. मात्र, महासंचालकांनी ऐनवेळी थेट मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. 

हव्यात सुविधा... 
आयुक्तालय स्थापन होऊन वर्ष उलटले आहे. मात्र, अद्यापही येथे पायाभूत सुविधांची वानवा आहे. आता गणेशोत्सवासह विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यादरम्यान, शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी किमान मनुष्यबळाची अपेक्षा अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police superintendent has not come to pimpri