Police Tarang-2023 : पोलिसांच्या ‘तरंग-२०२३’ मेळाव्याला जल्लोषात प्रारंभ

पोलिस दलाचे कामकाज नागरिकांना जवळून पाहण्याची संधी.
Police Tarang-2023 campaign
Police Tarang-2023 campaignsakal

पुणे - शिवाजीनगर पोलिस मुख्यालय...आधुनिक शस्त्रांनी सज्ज पुणे शहर पोलिस दल...महिलांच्या सुरक्षिततेसाठी भरोसा सेल, दामिनी पथकाचे कामकाज, वाहतूक शाखेकडून नियमांची माहिती, आपत्कालीन परिस्थितीत शीघ्र कृती दल (क्यूआरटी), ‘एनडीआरएफ’चे जवान नागरिकांचे संरक्षण कसे करतात, राज्य राखीव पोलिस दल, सायबर पोलिस, सीआयडी, बिनतारी संदेश, कारागृह विभाग अशा विविध विभागांतील अधिकारी-कर्मचारी नागरिकांना उत्साहाने आवर्जून माहिती देत होते.

तर नागरिकही मोठ्या उत्सुकतेने जाणून घेत होते. पहिल्या दिवशी विविध शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. सोबतीला सांस्कृतिक कार्यक्रमांचीही मेजवानी. निमित्त होते पुणे पोलिसांच्या ‘तरंग-२०२३’ मेळाव्याचे.

पोलिस आणि नागरिक यांच्यातील सौहार्दपूर्ण संबंध दृढ व्हावेत, या उद्देशाने पुणे पोलिसांतर्फे आयोजित ‘तरंग-२०२३’ मेळाव्याला शुक्रवारी (ता. २२) जल्लोषपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते मेळाव्याचे उद॒घाटन झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक निकेत कौशिक, प्रभारी पोलिस सहआयुक्त रामनाथ पोकळे, अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, रंजनकुमार शर्मा यांच्यासह अन्य वरिष्ठ पोलिस अधिकारी-कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

महिला, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलिसांकडून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत जनजागृती होण्यासाठी ‘महिला सुरक्षा’ लघुपटाची निर्मिती करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला. प्रारंभी पोलिस हवालदार नितीन जगताप यांनी गायलेल्या ‘कानडा राजा पंढरीचा’ या गाण्याने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.

२४ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या मेळाव्यात सकाळी ११ ते रात्री १० वाजेपर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत. सर्वांसाठी मोफत प्रवेश आहे. प्रदर्शनात खाद्य स्टॉल, खादी, दागिने, देशी पदार्थ, विविध कलाकृती, शालेय विद्यार्थ्यांसाठी खेळप्रकार, ‘गुड टच, बॅड टच’ असे प्रबोधनपर मार्गदर्शन, मनोरंजनासाठी ऑर्केस्ट्रा आणि मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. नागरिकांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन शहर पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांची प्रदर्शनास भेट

उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी रात्री या प्रदर्शनास भेट दिली. या वेळी त्यांनी पुणे पोलिसांकडून आयोजित ‘तरंग-२०२३’ कार्यक्रमाचे कौतुक केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com