लॉकडाऊन असताना गेले मॉर्निंग वॉकला अन्...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 April 2020

शहरात मॉर्निंग वॉक करणाऱ्या अतिउत्साही बारामतीकरांना आज पोलिसांनी आपला चांगलाच हिसका दाखवला.

बारामती : शहरात मॉर्निंग वॉक करणाऱ्या अतिउत्साही बारामतीकरांना आज पोलिसांनी आपला चांगलाच हिसका दाखवला. लॉकडाऊन काळात संचारबंदीचे उल्लंघन करून बिनधास्तपणे मॉर्निंग वॉक करणार्‍या स्त्री व पुरुषांसह 313 जणांवर पोलिसांनी कारवाई केली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरात वेगवेगळ्या ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या बारामतीकरांना पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी पकडून चालत शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर आणले. या ठिकाणी या उत्साही बारामतीकरांच्या नावांची नोंदणी पोलिसांनी करून घेतली आणि त्यानंतर या सर्वांना त्यांनी योगासनांचे धडेदेखील दिले.

यावेळी या नागरिकांसोबत स्थानिक पोलिसांनीही योगासनांमध्ये सहभाग घेतला .वारंवार सांगूनही सातत्याने लॉकडाऊनचे उल्लंघन विविध क्षेत्रातील नागरिक करत होते. पोलिसांनी रात्रीच मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासंदर्भात नियोजन केलेले होते. आज सकाळी पावणेसहा वाजता वेगवेगळ्या ठिकाणी पॉईंट लावून पोलिसांनी या नागरिकांना पकडले. यामध्ये अनेक प्रतिष्ठित नागरिकांचा देखील समावेश आहे. या सर्वांची नोंद पोलिस घेणार असून, योग्य ती कारवाई करणार आहेत.

दरम्यान, आगामी काही दिवसात मॉर्निंग आणि इविनिंग ह्या दोन्ही वॉक करणाऱ्या नागरिकांवर देखील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी विनाकरण रस्त्यावर फिरू नये, असे वारंवार आवाहन करूनही त्याला प्रतिसाद देत नसल्याने नाईलाजाने कारवाईची भूमिका घ्यावी लागली, अशी माहिती पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी दिली.

या कारवाईमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश शेलार, फौजदार पदमराज गंपले, सचिन शिंदे, रमेश भोसले यांच्यासह 50 कर्मचाऱ्यांनी यात सहभाग नोंदविला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Took Action against who break Law of Lock Down