नगरच्या तरुणीकडून पुण्यात पोलिसास लाथा-बुक्यांनी मारहाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

- मद्यपान केलेल्या तरूणीकडून महिला पोलिसास मारहाण
- फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील घटना

पुणे ः मद्यपान केलेल्या तरुणीने महिला पोलिस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून, लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तरुणीला अटक केली आहे. ही घटना बुधवारी पहाटे दोनला फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर घडली. न्यायालयाने तिला आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

सोनल सुनील सद्रे (वय 30, रा. सद्रेवाडा, भराड गल्ली, नगर) असे पोलिसांनी अटक केलेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी महिला पोलिस कर्मचारी पूजा हरिदास सारसर (वय 27) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तरुणाविरुद्ध दारूबंदी अधिनियम व सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सारसर या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास एक तरुणी ज्ञानेश्वर पादुका चौकात दारूच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत असल्याचा दूरध्वनी पोलिस नियंत्रण कक्षाला आला. त्यानुसार फिर्यादी यांच्यासह शिवाजीनगर पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी संबंधित तरुणी गोंधळ घालत असल्याचे निदर्शनास आले. सारसर यांनी तरुणीस समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने फिर्यादींना शिवीगाळ करीत लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Policewoman beaten up by drunk woman in pune