उंब्रज जिल्हा परिषद वार्तापत्र

उंब्रज जिल्हा परिषद वार्तापत्र

Published on

उंब्रजमध्ये राष्ट्रवादी- भाजपमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

निष्ठावंत विरुद्ध आयाराम वादाने निवडणुकीत रंगत

संतोष चव्हाण ः सकाळ छायाचित्रसेवा

उंब्रज, ता. २५ : कऱ्हाड उत्तर मतदारसंघाचे राजकीय प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या उंब्रज जिल्हा परिषद गट आणि गणांमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी या गटात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात अटीतटीची लढत होणार असल्याचे चित्र आहे. आमदार कोण होणार, याचा कौल देणाऱ्या या मतदारसंघात यावेळी दोन्ही पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून या गटावर माजी सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. हा गट राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, भाजपचे नवनिर्वाचित आमदार मनोज घोरपडे यांनी भाजपची ताकद वाढवली आहे. त्यामुळे यावेळचा सामना ‘ना भूतो ना भविष्यती’ असा होण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांकडे इच्छुकांची मोठी फौज असल्याने उमेदवारी देताना नेत्यांची मोठी कसरत होत आहे. राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेसाठी माजी सदस्य जयवंतराव जाधव यांचे चिरंजीव संग्रामसिंह जाधव, भाजपकडून महेशकुमार जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर राष्ट्रवादीच्या सोमनाथ जाधव, सुधाकर जाधव आणि जय पाटील यांनी, तर भाजपच्या रणजित जाधव यांनी अपक्ष म्हणून दंड थोपटले आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून ॲड. महादेव साळुंखे यांनीही आपला दावा ठोकला आहे.

पंचायत समितीसाठी उंब्रज गणात ओबीसी महिला आरक्षण असल्याने राष्ट्रवादीकडून संगीता चव्हाण, तर भाजपकडून शशिकला फणसे, अपक्ष म्हणून वर्षा माळी आणि जयश्री ढवळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तळबीड गणात राष्ट्रवादीकडून जयवंत मोहिते, भाजपकडून उमेश मोहिते यांच्यात लढत होणार आहे. याशिवाय येथे अपक्षांची मोठी मांदियाळी असून, बाळासाहेब पवार, कृष्णत पवार, संग्राम पवार, दिनेश घाडगे यांच्यासह अनेकांनी शड्डू ठोकला आहे. सध्याच्या राजकारणात उमेदवारी देताना ‘आर्थिक सक्षमते’ला अधिक महत्त्व दिले जात असून, प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याची भावना जनमानसात आहे. मतदारांना दिल्या जाणाऱ्या आमिषामुळे सक्षम आणि श्रीमंत उमेदवार देणे ही पक्षांची हतबलता बनली आहे.

चौकट
आयारामांमुळे निष्ठावंत नाराज
भाजपमध्ये गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणात इतर पक्षांतून आवक झाली आहे. त्यांना झुकते माप मिळत असल्याने जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये मोठी धुसफूस सुरू आहे. नाराजीपोटी काही कार्यकर्त्यांनी पक्षांतर करून दुसऱ्या पक्षातून अर्ज दाखल केल्याने याचा फटका मुख्य निकालाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com