VidhanSabha 2019 : पिंपरी, मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीच्या यादीने उलथापालथ 

अविनाश म्हाकवेकर
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

राष्ट्रवादी कॉंग्रेसने गुरुवारी (4 ऑक्टोबर) सकाळी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आणि इतके दिवस शांत असलेले शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. संपूर्ण दिवस मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथापालथीचा ठरला.

पिंपरी (पुणे) : राष्ट्रवादी कॉंग्रेसने गुरुवारी (4 ऑक्टोबर) सकाळी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आणि इतके दिवस शांत असलेले शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. संपूर्ण दिवस मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथापालथीचा ठरला. यादी उशिरा जाहीर करण्याचा राष्ट्रवादीचा डाव मावळात यशस्वी, तर पिंपरीत अंगाशी आला. कारण मावळात भाजपचा तगडा कार्यकर्ता उमेदवार म्हणून हाताशी लागला. मात्र, पिंपरीत बंडखोरीला सामोरे जावे लागले. असाच प्रकार भाजपमध्येही घडला असून तेथेही याच मतदारसंघांमध्ये बंडखोरी व युतीत बंडाळी झाली. भोसरीमध्ये भाजपने उमेदवार जाहीर केला आहे, तर राष्ट्रवादीने नाव गुलदस्तात ठेवले आहे. त्यामुळे तेथे आपल्याच कार्यकर्त्याला अपक्ष उभा करून शिवसेना व भाजपमधील नाराजीचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

पिंपरी मतदारसंघ युतीच्या जागा वाटपात शिवसेनेला मिळाला आहे. त्यामुळे त्यांनी विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांना उमेदवारी दिली. ते आज अर्ज भरत असतानाच, भाजपमधील इच्छुक अमित गोरखे यांनी अर्ज भरला. ते अण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष आहेत. तीन महिन्यापूर्वीच त्यांना हे पद मिळालेले आहेत. तरीही त्यांनी बंडखोरी असून युतीत बंडाळी घडवून आणली. अर्ज माघारीपर्यंत ते किती ठाम राहतात यावर बरेचसे अवलंबून आहे. दरम्यान, याच ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुलक्षणा धर-शीलवंत यांना उमेदवारी जाहीर केली. याबाबतची यादी हातात पडताच माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी अपक्ष उमेदवार अशी स्वतःच घोषणा करून टाकली. बनसोडे हे 2009 मध्ये आमदार होते. 2014 मध्ये चाबुकस्वार यांच्याकडून पराभूत झालेले आहेत. हे चर्चेचे वावटळ थांबण्याअगोदरच शेखर ओव्हाळ यांनीही रिंगणात उडी ठोकून पक्षासमोरील डोकेदुखी वाढविली आहे. 

मावळ मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. सलग 25 वर्षे त्यांचा आमदार आहे. सलग तिसरी टर्म कोणालाही उमेदवारी न देण्याचा प्रघात पक्षाने पाळल्यास विद्यमान आमदार, कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे यांना या वेळी उमेदवारी मिळणार नाही, असे गृहीत धरून अनेक इच्छुक कामाला लागले होते. दरम्यान, बुधवारी रात्री उशिरा भाजपने बाळा भेगडे यांनाच उमेदवारी दिली आणि इच्छुकांमध्ये भडका उडाला. राष्ट्रवादीला याची कल्पना असल्यानेच भाजपमधील इच्छुक सुनील शेळके यांना उमेदवारी जाहीर केली. ते तळेगाव नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आहेत. भाजपमधील तिसरे इच्छुक रवींद्र भेगडे यांनीही बंडखोरी करत रिंगणात उडी मारली आहे. त्यामुळे ही निवडणूक भाजपच्या तीन कार्यकर्त्यांमध्येच होणार आहे. 

भोसरीमध्ये सहयोगी आमदार महेश लांडगे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. येथे अजून तरी राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे तेथील उत्कंठा कायम आहे. माजी आमदार विलास लांडे यांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरतील, अशी चर्चा आहे. भोसरीची जागा न मिळाल्याने शिवसेनेत नाराजी आहे. बुधवारी अशाच नाराज पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत हाणामारी झाली होती. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेसह नाराज कार्यकर्ते पाठीशी राहतील, तसेच आपल्या पक्षातील इतरांची नाराजीही उद्‌भवणार नाही, याची काळजी यामागे घेतली असावी, अशी शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

चिंचवडमध्ये भाजपने आमदार लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली आहे. ते यापूर्वी एकदा अपक्ष व एकदा राष्ट्रवादीकडून विजयी झाले आहेत. 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश करून पुन्हा एकदा विजय मिळविला आहे. या वेळी ते चौथ्यांदा रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांना उमेदवार घोषित केले आहे. ते माजी नगरसेवक असून जगताप यांचे सध्या कट्टर विरोधक आहेत. तीन वर्षांपूर्वी त्यांच्यात वितुष्ट आले. त्यापूर्वी ते गुरू-शिष्यच होते.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: political inflexion when ncp declare candidate list in pimpri and maval assembly