मोहिते पाटील राजकीय सावलीच्या शोधात; पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी धौर्यशील मोहिते पाटील यांना डिवलचे
मोहिते-पाटील राजकीय सावलीच्या शोधात
पालकमंत्री जयकुमार गोरे; आमदार जानकरांवरही साधला निशाणा
सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. २० : राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुन्हा एकदा माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते- पाटील यांना डिवचले आहे. मोहिते- पाटील गरज पडेल तेव्हा राजकीय छत शोधण्याचा प्रयत्न करतात; पण यापुढे अशा प्रकारचे राजकारण चालणार नाही, असा इशारा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला आहे.
मंत्री गोरे यांनी आज (शुक्रवारी) पंढरपुरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खासदार मोहिते- पाटील आणि माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांच्यावर निशाणा साधला.
अलीकडे खासदार धैर्यशील मोहिते- पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तर माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी शिवसेनेचे नेते तथा मंत्री उदय सामंत व भरत गोगावले यांची भेटी घेतली. मोहिते पाटील- जानकर यांच्या भेटीमुळे मोहिते- जानकर यांची शिवसेनेशी जवळीक वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याविषयी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी, मोहिते- पाटील व जानकर यांना यापुढे सहजासहजी राजकीय छत उपलब्ध होणार नाही, असा इशारा दिला.
मंत्री गोरे म्हणाले, राज्यातील व सोलापूर जिल्ह्यातील जनतेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून त्यांचे नेतृत्व मान्य केले आहे. सोलापूर महानगरपालिका व जिल्हा परिषदेमध्ये भाजपने स्वबळावर सत्ता आणली आहे. जे आम्हाला सुपडा साफ करू, असे म्हणायचे, त्यांचाच येथील जनतेने सुपडा साफ केला आहे. त्यामुळे ते राजकीय छत शोधायचा प्रयत्न करत आहेत. परंतु, मोहिते- पाटील यांना कुठलेही छत सहजासहजी उपलब्ध होणार नाही. गरज पडली तेव्हा सावली शोधली आणि गरज संपली की पुन्हा सोडून द्यायचे, असे राजकारणात चालत नाही.
सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा कार्यकर्ता म्हणून भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष करणे याला प्राधान्य आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांना काय वाटते, हा माझा विषय नाही.
देसाई यांच्याशी संवाद साधणार का, असे विचारले असता त्यांनी या प्रश्नाला बगल देत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी संवाद साधतील आणि मार्ग निघेल, असे स्पष्ट केले.
-----
चौकट
उमराणी बंधाऱ्यातून पाणी सोडण्याच्या सूचना
कर्नाटकातील उमराणी बंधाऱ्यातून पाणी सोडण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक सरकारला दिल्या आहेत. लवकरच दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावांचा पाणीप्रश्न सुटेल, असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. उजनी धरणातून भीमा नदीद्वारे सोडण्यात आलेले पाणी कर्नाटकातील उमराणी बंधाऱ्यात अडविण्यात आले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील मंद्रूपसह सात ते आठ गावांतील शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याविषयी ‘सकाळ’मधून आवाज उठवण्यात आल्यानंतर आज पालकमंत्री जयकुमार यांनी, याप्रश्नी सरकारने लक्ष घातले आहे. मुख्यमंत्र्यांनी तशा सूचना दिल्या आहेत. उमराणी बंधाऱ्यालगतचा विद्युतपुरवठा खंडित करण्याचे आदेश कर्नाटकातील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून, येथील पाणीप्रश्न सुटेल, असे आश्वासन दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

