पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक : आंबेगाव तालुक्यात आठ मतदान केंद्र

डी. के. वळसे पाटील
Saturday, 28 November 2020

आंबेगाव तालुक्यात मतदानासाठी आठ मतदान केंद्रावर मतदानाची व्यवस्था केली.

मंचर (पुणे) : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक मतदान मंगळवारी (ता. ०१ डिसेंबर) रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. आंबेगाव तालुक्यात मतदानासाठी आठ मतदान केंद्रावर मतदानाची व्यवस्था केली. मतदानाची जय्यत तयारी झाली आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी व मते बाद होवू नये, म्हणून जनजागृती अभियान राबविले जात आहे, अशी माहिती आंबेगावच्या तहसीलदार रमा जोशी यांनी दिली.

आंबेगाव तालुक्यात पदवीधर मतदारांची संख्या एक हजार ९०२ व शिक्षक मतदारांची संख्या ७४५ आहे. केंद्रनिहाय चार पदवीधर व चार शिक्षक निवडणूक मतदान केंद्र पुढील प्रमाणे  
शाळेचे नाव (पदवीधर व शिक्षक मतदार संख्या अनुक्रमे) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिंभे खुर्द (१४९, ८८), जनता विद्या मंदिर घोडेगाव (४१८, २२३), महात्मा गांधी विद्यालय, मंचर (पदवीधर ८५१) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंचर (शिक्षक-३०४), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक (४८४, १३०)
    
मतदार जनजागृती करण्यासाठी तहसील कार्यालयात कक्षाची स्थापना केली आहे. मतदार जनजागृती पथक प्रमुख सुनील भेके म्हणाले, मतदार जनजागृती अभियान प्रभावीपणे राबवून नोंदणी केलेल्या सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन मतदार जनजागृती पथक सदस्य सचिन तोडकर, काशिनाथ घोंगडे, विजय घिसे, राहुल रहाटाडे, मंगेश जावळे, अशोक लोखंडे, संदीप बोंबले हे गावोगावी जावून करत आहेत.

मत कसे नोंदवावे

मतपत्रिकेसोबत पुरवण्यात आलेल्या जांभळ्या शाईच्या स्केच पेननेच मत नोंदवावे. इतर कोणताही पेन-पेन्सिल बॉलपेनचा वापर करू नये. मतदाराने आपल्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील पसंतीक्रम रकान्यात 1 हा अंक लिहून मत नोंदवावे. एका उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात एकाच पसंतीक्रमाचा अंक नोंदवावा. तो पसंतीचा क्रमांक इतर कोणत्याही उमेदवारासमोर नोंदवू नये. पसंतीक्रम हे केवळ 1,2,3 इत्यादी अशा अंकामध्ये नोंदवण्यात यावेत. एक, दोन, तीन इत्यादी शब्दांमध्ये नोंदवण्यात येऊ नयेत.

पसंतीक्रम नोंदवतांना वापरावयाचे अंक हे भारतीय अंकाच्या आंतरराष्ट्रीय स्वरूपात जसे 1,2,3 इत्यादी किंवा रोमन अंक स्वरूपात किंवा मराठी भाषेतील देवनागरी १,२,३ या स्वरूपात नोंदवावे. मतपत्रिकेवर कोठेही आपली स्वाक्षरी, आद्याक्षरे नाव किंवा अन्य कोणताही शब्द लिहू नये तसेच मतपत्रिकेवर अंगठ्याचा ठसा उमटवू नये. मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदवताना टिकमार्क √  किंवा क्रॉस मार्क × अशी खूण करु नये अशी मतपत्रिका अवैध ठरेल. मतपत्रिका वैध ठरावी याकरिता आपण पहिल्या पसंतीक्रमाचे मत नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे. अन्य पसंतीक्रम नोंदवणे ऐच्छिक आहे, अनिवार्य नाही.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Polling has been arranged at eight polling stations in Ambegaon taluka