पुणेकरांनो सावधान... प्रदूषण वाढतेय; फटाक्‍यांमुळे आणखीन वाढ होण्याची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 November 2020

सध्या शहरातील हवामान कोरडे असल्याने या प्रदूषणात वाढ होत असून, सर्वाधिक धोका हा अतिसूक्ष्म धूलिकणाचा असल्याचे "आयआयटीएम'च्या शास्त्रज्ञांतर्फे सांगण्यात आले आहे. 

पुणे  - लॉकडाउनच्या काळात पुणे शहराचा उत्तम श्रेणीत असलेला हवेचा दर्जा मात्र अनलॉकनंतर घसरत चालला आहे. अनलॉकमुळे शहरातील विविध व्यवसाय, आस्थापना, कंपन्या तसेच बांधकाम व्यवसाय सुरू झाल्याने रस्त्यावरील वाहतुकीची वर्दळ वाढली आहे. परिणामी सध्या शहरातील हवेची गुणवत्ता उत्तम श्रेणीतून घसरत मध्यम श्रेणीत आल्याचे भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या वतीने (आयआयटीएम) स्पष्ट करण्यात आले आहे. दिवाळीतील फटाक्‍यांमुळे प्रदूषणाच्या पातळीत आणखीन वाढ होण्याची शक्‍यताही शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

गेल्या तीन वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत यंदा नागरिकांनी 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त फटाक्‍यांचा वापर केला तर शहरातील हवेचा दर्जा अजून घसरण्याची शक्‍यता आहे. मॉन्सूनच्या काळात प्रदूषणातील घटक हे पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जातात. यंदा मॉन्सूनचा बराच कालावधी हा लॉकडाउनमध्ये असल्याने शहरातील हवेची गुणवत्ता ही चांगल्या श्रेणीमध्ये राहिली; परंतु सध्या शहरातील हवामान कोरडे असल्याने या प्रदूषणात वाढ होत असून, सर्वाधिक धोका हा अतिसूक्ष्म धूलिकणाचा असल्याचे "आयआयटीएम'च्या शास्त्रज्ञांतर्फे सांगण्यात आले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अतिसूक्ष्म धूलिकण वाढले 
"आयआयटीएम'च्या वतीने पुणे, मुंबई, दिल्ली व अहमदाबाद या चार शहरांतील हवेच्या गुणवत्तेची नोंद केली जाते. शहरातील विविध भागांमध्ये सूक्ष्म धूलिकण (पीएम 10), अतिसूक्ष्म धूलिकण, नायट्रोजन डायऑक्‍साईड (एनओ 2), कार्बन डायऑक्‍साईड (सीओ 2) सारख्या प्रदूषकांची नोंद "आयआयटीएम'मार्फत केली जाते. सध्या शहरात अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण वाढत असून, याचा घातक परिणाम आरोग्यावर होतो. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप पूर्णपणे कमी झाला नसून, प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. प्रदूषणातील घटक हे श्‍वसनाशी संबंधित आजारांमध्ये वाढ करू शकतात. त्यामुळे नागरिकांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी. फटाक्‍यांचा वापर टाळावा, यामुळे प्रदूषणाला काही प्रमाणात नियंत्रणात ठेवणे शक्‍य होईल. 
- मंगेश दिघे, पर्यावरण विभागप्रमुख, महापालिका 

शुक्रवारी झालेली प्रदूषणाची नोंद 
(प्रमाण मायक्रोग्रॅम प्रतिक्‍युबिक घन मीटर) 
ठिकाण - पीएम 2.5 - पीएम 10 
पाषाण - 71 - 72 
कोथरूड - 200 - 118 
शिवाजीनगर - 169 - 133 
निगडी - 108 - 94 
हडपसर - 135 - 114 
लोहगाव - 118 - 106 
भूमकर चौक - 197 - 136 
भोसरी - 190 - 136 
आळंदी - 162 - 118 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pollution is on the rise; Possibility of further increase due to firecrackers

Tags
टॉपिकस
Topic Tags: