सोलापूर-पंढरपूर बाजार समितीत डाळिंबाला मिळाला १८० रुपयांचा उच्चांकी दर

सोलापूर-पंढरपूर बाजार समितीत डाळिंबाला मिळाला १८० रुपयांचा उच्चांकी दर
Published on

पंढरपूर बाजारात डाळिंबाला
प्रति किलो १८० रुपये दर

मर्यादित आवकेमुळे बाजारात तेजी

ॲग्रोवन वृत्तसेवा
पंढरपूर, जि. सोलापूर ः पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब सौदे बाजारात शनिवारी (ता. २०) डाळिंबाला उच्चांकी भाव मिळाला. उत्तम प्रतीच्या डाळिंबाला प्रति किलो तब्बल १८० रुपये असा यंदाच्या हंगामातील सर्वाधिक दर मिळाला आहे. सध्या बाजारात डाळिंबाची आवक मर्यादित असल्याने दरामध्ये ही तेजी राहिल्याचे सांगण्यात आले.
शनिवारी येथील बाजार समितीत सुमारे ५० टन डाळिंबाची आवक झाली. मालाच्या दर्जानुसार प्रति किलो किमान ८५ रुपये, कमाल १८० रुपये दर मिळाला. रोहन आडेगावकर (रा. पाटकूल, ता. मोहोळ) यांच्या ‘भगवा’ जातीच्या उत्कृष्ट दर्जाच्या डाळिंबाला व्यापारी आतीब बागवान यांच्या दुकानात १८० रुपये प्रति किलोचा सर्वोच्च दर मिळाला. त्याशिवाय महादेव लवटे (रा. खर्डी, ता. पंढरपूर) यांच्या डाळिंबाला १७० रुपये प्रति किलोचा दर मिळाला. त्यांच्या केवळ ४८ किलो डाळिंबाच्या विक्रीतून त्यांना ८ हजार १६० रुपयांचे बंपर उत्पन्न मिळाले. काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य स्थितीमुळे निर्यात विस्कळीत झाली होती, ज्याचा थेट फटका शेतीमालाच्या दरांना बसला होता. मात्र, आता जागतिक परिस्थिती सुधारत असून आंतरराष्ट्रीय व्यापाराला पुन्हा वेग आला आहे. याचा सकारात्मक परिणाम डाळिंब, केळी आणि साखरेसह इतर कृषी मालाच्या दरांवर स्पष्टपणे दिसून येत आहे. सध्या डाळिंबाची आवक मर्यादित स्वरूपात होत आहे आणि मागणी मोठी आहे. जागतिक बाजारपेठ खुली झाल्याने आगामी काही दिवस डाळिंब दरातील तेजी असेच टिकून राहण्याची शक्यता आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com