...तर तुमचाही प्रँक व्हिडिओ दिसेल टिकटॉकवर!

अमोल कविटकर
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

- तरुणींचा प्रँक व्हिडिओ तयार करुन तो टिकटॉकवर अपलोड करण्यात आला.

पुणे : टिकटॉक हे अॅप दिवसेंदिवस लोकप्रिय होत असताना यातील धक्कादायक प्रकारही पुढे यायला सुरुवात झाली आहे. सारसबाग परिसरात उभ्या असलेल्या तरुणींचा प्रँक व्हिडिओ तयार करुन तो टिकटॉकवर अपलोड करण्यात आला. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर संबंधित तरुणीने थेट सायबर पोलिसांकडे तक्रार केली असून, या प्रकारामुळे महिला वर्गात चांगलीच धडकी भरली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

टिकटॉकवरील व्हिडिओ पाहून एखादा क्षण तुमचं मनोरंजन होईलही. मात्र, पुण्यातील व्हिडिओमागचे सत्य जाणून घेतले तर तुम्हाला तुमच्या घरातील महिलांची काळजी वाटू लागेल. कारण संबंधित व्हिडिओत दिसणाऱ्या मुलींना आपल्यासमोर घडणारा प्रकार टिकटॉकसाठी शूट होतोय, याची पुसटशीही कल्पना नव्हती. समोर जे काही होतंय ते सहजच घडत आहे, असे त्या मुलींना वाटले.

या प्रकारात दोन मुलांची धडक होते आणि त्यातून कुबड्या वापरणारा एक युवक खाली पडतो. मात्र, कुबड्या घेऊन पडणारा युवक उठताना मात्र धडकणाऱ्या तरुणालाच कुबड्या देतो आणि पुढे निघून जातो. पाहणाऱ्या मुलीही काही काळ गोंधळात पडतात आणि विषय सोडूनही देतात. मात्र, सारसबाग परिसरात बनाव करून काढलेला व्हिडिओ हा टिकटॉकवर अपलोड केल्यावर प्रचंड व्हायरल झाला आणि संबंधित मुलींना व्हिडिओ संदर्भात विचारणा होऊ लागली. मात्र, ज्यावेळी त्यांनी हा व्हिडिओ पाहिला. त्यावेळी त्यांनाही काही कळेनासे झाले.

व्हायरल झालेल्या व्हिडिओचा सगळा प्रकार मुलीने कुटुंबियांना सांगितला आणि कुटुंबियांनीही मोठ्या धाडसाने थेट सायबर पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा नोंदवला.

टिकटॉक हे अॅप क्रिएटिव्ह व्हिडिओसाठी प्रसिद्ध आहे. हे अॅप अगदी ग्रामीण भागातही पोहोचल्याने याची लोकप्रियताही मोठी आहे. अगदी तळागाळातील घटकांना कला आणि अभिनयासाठी हे आपले व्यासपीठ वाटू लागले आहे. मात्र, दुसरीकडे समोर आलेली ही बाजू अनेकांची चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे पोलिसांनी टिकटॉकवर स्टार होण्यासाठी बनाव करून व्हिडिओ तयार करणाऱ्या ठगांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

'महिला सार्वजनिक ठिकाणी असतील तर त्यांचे व्हिडिओ काढून टिकटॉकवर अपलोड केल्याचे दोन प्रकार समोर आले आहेत. महिलांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना आपले कोणी नकळत व्हिडिओ शूट तर करत नाहीत ना, याची काळजी घ्यावी. जर असा काही प्रकार घडत असेल तर थेट सायबर पोलिसांशी संपर्क साधावा'

- जयराम पायगुडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: possibilities of making Prank Video on Tik Tok