सिंहगड रस्ता वृक्षतोड प्रकरणी फौजदारी कारवाईची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

महाजनादेश यात्रेच्या नावाखाली मोठमोठ्या फांद्या तोडण्यात आल्याचे प्रकरण संबंधितांना चांगलेच महागात पडणार आहे. त्यांच्यावर कारवाईचा मान्यतेचा प्रस्ताव आयुक्त सौरभ राव यांच्या समोर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, यामध्ये फौजदारी कारवाईची शक्यता असल्याचे सुत्रांनी सांगितले.

पुणे : महाजनादेश यात्रेच्या नावाखाली मोठमोठ्या फांद्या तोडण्यात आल्याचे प्रकरण संबंधितांना चांगलेच महागात पडणार आहे. त्यांच्यावर कारवाईचा मान्यतेचा प्रस्ताव आयुक्त सौरभ राव यांच्या समोर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, यामध्ये फौजदारी कारवाईची शक्यता असल्याचे सुत्रांनी सांगितले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा गेल्या आठवड्यात पुण्यात आलेली असताना त्यांच्या रथाला झाडांच्या फांद्यांचा अडथळा होऊ नये यासाठी अनेक ठिकाणच्या फांद्या छाटून टाकण्यात आल्या. पण सिंहगड रस्त्यावर रस्त्याच्या बाजूच्या फांद्या छाटणी ऐवजी बुडापासून काही फूट उंचीवर असलेल्या मोठ्या फांद्या कटरने तोडून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हा प्रकार निदर्शनास आणून दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक जरी झाड तोडले असले तरी कारवाई करणार असे स्पष्ट केले होते. या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश वृक्ष प्राधिकरणाचे अधिकारी गणेश सोनूने यांना दिले होते. त्यांनी अहवाल सादर करण्यापूर्वी सर्वसाधारण सभेत महावितरणने फांद्या तोडल्याचे सांगितले, पण ही माहिती खोटी असल्याचेही 'सकाळ'ने प्रत्यक्ष पहाणी करून समोर आणले होते.

 वृक्षतोड प्रकरणाचा अहवाल अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांना सादर करण्यात आला आहे. हा अहवाल बघून त्यावर त्यांनी पुढील कारवाई करण्यासाठी आयुक्तांच्या मान्यतेसाठी फाईल पाठवली आहे. 
रूबल अग्रवाल म्हणाल्या, ''सिंहगड रस्ता वृक्षतोड प्रकरणाचा अहवाल मिळाला आहे. त्यावर मी माझे मत लिहून ती आयुक्तांच्या फाईल पाठवली आहे. त्यावर सही झाल्यावर त्यातील तपशील सांगितला जाईल.'' 
दरम्यान या प्रकरणात फौजदारी कारवाई होण्याची शक्यता असल्याचे सुत्रांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The possibility of criminal prosecution in Sinhagad road tree erosion