esakal | काय करावं चोरट्यांना ! गड्यांनी पोस्टाची 300 रुपयांची लाल पत्रपेटीही सोडली नाही !
sakal

बोलून बातमी शोधा

Post Box

काय करावं चोरट्यांना ! गड्यांनी पोस्टाची 300 रुपयांची लाल पत्रपेटीही सोडली नाही !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - आत्तापर्यंत चोरट्यांनी (Thief) घरफोडी केली, दुकाने लुटले किंवा वाईनशॉपीमध्ये चोरी केली, इथपर्यंत आपण ऐकत आलो होतो. काही महिन्यांपुर्वी चोरट्यांनी शाळा, दवाखाना, मेडीकलमध्येही चोरी (Theft) केल्याच्या भन्नाट किस्से आपण ऐकले. पण रस्त्याच्याकडेला पदपथावर असलेली पोस्टाची लाल पत्रपेटी (Post Box) कधी चोरीला गेल्याचे तुम्ही कधी ऐकलेय का हो, नाही ना. पण पुण्यात 300 रुपये किंमतीची पोस्टाची लाल पेटी चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अगदी पत्रपेटीचीही चोरी करायची न सोडणाऱ्या या चोरट्यांना आता काय कराव ! असा प्रश्‍न पडल्याशिवाय राहात नाही. (Post Box Theft by Thief Crime)

काही महिन्यांपुर्वी चोरट्यांकडून शाळा-कॉलेजची कार्यालये, दवाखाने, मेडीकल अशा कधी चोरी न होणाऱ्या ठिकाणांवरही चोरी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. एकूणच घरफोडी, वाहनचोरी, बस किंवा लग्नामधील चोरी अशा नेहमीच्या चोरीच्या प्रकारांपेक्षा चोरट्यांचे नवीन चोरी प्रकार जरा धक्का देणारेच होते. त्यामुळे साहजिकच नागरीकांनाही धक्का बसला होता. पण आता मात्र चोरट्यांनी कहरच केला आहे. सेनापती बापट रस्त्यावरील सहारा हॉटेलसमोर पोस्ट ऑफीसकडून अनेक वर्षांपुर्वी लाल पत्रपेटी बसविलेली आहे.

हेही वाचा: व्यापाऱ्यांना कर्जाचे हप्ते, टॅक्समध्ये निम्मी सवलत द्या

शिवाजीनगर येथील मॉर्डर्न कॉलनी पोस्ट कार्यालयातील शिपाई नाथू बधे (वय 53, रा.हडपसर) नेहमीप्रमाणे 1 मे रोजी त्यांच्या पोस्ट ऑफीसच्या हद्दीमध्ये येणाऱ्या सेनापती बापट रस्त्यावरील सहारा हॉटेलसमोरील बाजुच्या भिंतीच्या ग्रीलला तारेने बांधलेली पोस्ट कार्यालयाच्या लाल पत्रपेटीतील पत्र काढण्यासाठी गेले. पत्र काढल्यानंतर त्यांनी ती पत्रपेटी कुलूप लावून बंद केली. त्यानंतर ते पुन्हा 3 मे रोजी संबंधीत पत्रपेटी खोलण्यासाठी गेले.

तेव्हा, त्यांना तेथील पत्रपेटीच अनोळखी व्यक्तींनी काढून चोरुन नेल्याचे निदर्शनास आले. भारतीय डाक असा उल्लेख असलेली 300 रुपये किंमतीची पत्रपेटी अनोळखी व्यक्तीने चोरुन नेली. याप्रकरणी त्यांनी तत्काळ चतुःशृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली.

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा