अर्थचक्राची "ऊर्जा' डिम;पुणे परिमंडलात विजेचा वापर अजूनही कमीच! 

उमेश शेळके - सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 24 September 2020

महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर म्हणजे पुणे. परंतु कोविड- 19चा फटका शहर व परिसराच्या उत्पन्नाला कसा बसला त्याचे हे उदाहरण. अनलॉकनंतरही विजेच्या मागणीत झालेली घट यावरून हे समोर आले आहे. 

पुणे - मांगडेवाडी येथे माझा स्पेअर पार्ट तयार करण्याचा कारखाना आहे. दर महिन्याला दहा हजार युनिट विजेचा वापर होतो. मात्र, सध्या महिन्याला आठ ते साडेआठ हजार युनिटच विजेचा वापर होत आहे. कामगारांची कमतरता, कच्च्या मालाचे वाढलेले दर आणि वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा ही त्यामागील कारणे आहेत. त्यामुळे ऑर्डर असूनही पुरवठा करणे शक्‍य होत नाही, असे कारखान्याचे मालक राहुल झाड सांगत होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अशीच काहीशी परिस्थिती ही पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात असलेल्या लघू उद्योगांची आहे. मोठ्या कंपन्यांमध्येही यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नाही. कोविड- 19 मधून आपण किती बाहेर पडलो, याची माहिती घेतल्यानंतर पुणे परिमंडलातील विजेचा वापर कमी झाला असल्याचे समोर आले आहे. 

शहर, राज्य अथवा देशाचा सकल उत्पन्न (जीडीपी) मोजण्याच्या मोजमापापैकी एक म्हणजे वीज वापर... जेवढा अधिक वीज वापर तेवढा प्रगतीचा वेग अधिक असे समजले जाते. महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर म्हणजे पुणे. परंतु कोविड- 19चा फटका शहर व परिसराच्या उत्पन्नाला कसा बसला त्याचे हे उदाहरण. अनलॉकनंतरही विजेच्या मागणीत झालेली घट यावरून हे समोर आले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सर्व व्यवहार सुरळीत असताना पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील सात तालुक्‍यात मिळून असलेल्या वीजवापरापेक्षा तब्बल दोनशे दशलक्ष युनिट विजेची मागणी कमी झाली असल्याचे दिसून आले आहे. यावरून अद्यापही पुणे आणि परिसराचे अर्थचक्र अद्यापही पूर्णपणे सुरळीत झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याचे साधारणपणे "पर कॅपिटा' वापर (प्रतिव्यक्ती वीजवापर) 1320 युनिट इतका आहे. 2010 पासून आजपर्यंत त्यामध्ये सरासरी 4 टक्के वाढ होऊन तो 1320 युनिटपर्यंत झाला होता. परंतु कोविड-19 मुळे पुन्हा "पर कॅपिटा' वीजवापरावर कमी झाला आहे. पुणे शहर व परिसराच्या सकल उत्पन्नावर वाईट परिणाम झाला असल्याचे दिसून आले आहे. 

लॉकडाउन पूर्वीची स्थिती 
पुणे परिमंडळात पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील हवेली, मुळशी, वेल्हे, मावळ, जुन्नर, आंबेगाव आणि खेड या तालुक्‍यांचा समावेश होतो. सर्वसाधारणपणे या परिमंडळात सर्व प्रकारचे मिळून महावितरणची सुमारे 29 लाख वीज ग्राहक आहेत. तसेच चाकण, हिंजवडी, खराडी, पिंपरी-चिंचवड, तळेगाव इत्यादी औद्योगिक वसाहती आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारीत अनुक्रमे 1214 आणि 1199 दशलक्ष युनिट इतका वीज वापर होत होता. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

लॉकडाउन नंतरची स्थिती 
मार्चमध्ये पुणे शहरात पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला. 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू देशभरात पाळण्यात आला. त्यानंतर काही दिवसातच 23 मार्च पासून संपूर्ण राज्यात लॉकडाउन लागू करण्यात आला. या काळात सर्व उद्योगधंदे आणि व्यापार बंद राहिले. मार्च, एप्रिल आणि मेमध्ये विजेचा वापर 870 दशलक्ष युनिटपर्यंत खाली आला. एक जूनपासून शहरात टप्याटप्प्याने काही प्रमाणात व्यवहार सुरळीत करण्यास राज्य सरकारकडून परवानगी देण्यात आली. तेव्हा विजेच्या मागणीत हळूहळू वाढ झाली. 870 वरून 972 दशलक्ष युनिटवर इतका विजेचा वापर वाढला. त्यानंतर जुलै आणि ऑगस्टमध्ये हा वापर अनुक्रमे 1087 आणि 1052 दशलक्ष युनिट इतका नोंदविला गेला. तरी देखील लॉकडाउन पूर्वी आणि ऍनलॉकनंतरच्या मागणीत तब्बल दोनशे दशलक्ष युनिटचा वापर कमी होत असल्याचे दिसून आले आहे. 

मागणी कमी असण्यामागील कारणे 
-औद्योगिक विजेचा वापर कमी. 
- माहिती तंत्रज्ञान कंपन्यांकडून अद्यापही वर्क फ्रॉम होम सुरूच 
- चित्रपटगृहे, मॉल, नाट्यगृह, स्विमिंगपूल अद्याप बंद. 
- कारखाने आणि उद्योगधंदे पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. 
- वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा 

मागणीनुसार विजेचा पुरवठा केला जातो. औद्योगिक वापरासाठी सर्वसाधारणपणे 11 किलो वॅटच्यावर पुरवठा केला जातो. तर घरगुती वापरासाठी 11 किलोवॅटपेक्षा कमी पुरवठा केला जातो. लॉकडाऊन आणि त्यानंतर अनलॉकमध्ये "वर्क फ्रॉम होम'ला माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राकडून प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे घरगुती विजेचा वापर वाढला आहे. परंतु औद्योगिक विजेचा वापर पूर्वी जेवढा होता, त्यापेक्षा कमीच असल्याचे निदर्शनास आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Power consumption is still low in Pune zone