पीपीई किट, सॅनिटायझर आता निर्यातीच्या मार्गावर - नितीन गडकरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

देशातील सर्वच उद्योग व्यवसाय हे स्थलांतरित कामगारांवर चालत नाहीत.सुमारे वीस टक्के कामगार हा स्थानिक असतो.व्यवसाय सुरू झाल्यानंतर ते पुन्हा कामावर हजर होतील.असेही गडकरी म्हणाले

पुणे - कोरोनापासून बचाव करण्यासाठी आवश्यक असलेले पीपीई किट दोन महिन्यापूर्वी विशेष विमानाने देशात आणण्यात आले. त्यावेळी सॅनिटायझरचाही तुटवडा होता. मात्र आता या दोन्हींचे उत्पादन ‘सरप्लस’ असून ते निर्यातीच्या मार्गावर आहे, अशी माहिती केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग तसेच रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सूक्ष्म, लघू व मध्यम (एमएसएमई) उद्योगासह इतर व्यवसायांना असणाऱ्या समस्याबद्दल चर्चा करण्यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरतर्फे (एमसीसीआयए) वेबिनार आयोजित करण्यात आला होते. एमसीसीआयएचे अध्यक्ष प्रदीप भार्गव, महासंचालक प्रशांत गिरबने यांच्यासह उद्योग क्षेत्रातील 350 हुन अधिक व्यक्ती यात सहभागी झाल्या होत्या. 

गडकरी म्हणाले, "सॅनिटायझरचे पुरेसे उत्पादन व्हावे म्हणून साखर कारखान्यांना त्याची निर्मिती करण्याची विनंती आम्ही केली होती. त्यामुळे बाराशे रुपये प्रति लिटर असणारे सॅनिटायझर 160 रुपयांवर येऊन पोचले. समस्येला संधीत परिवर्तित करायची बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. निराशेतून काम होणार नाही. मात्र आत्मविश्वास असला तर पुढे जाऊ शकतो. कोरोना आणि आर्थिक अशा दोन्ही लढाया आपल्याला लढायच्या आहेत. उद्योग क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्यांवर आमचे लक्ष असून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे." उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी विचारलेल्या विविध प्रश्नांना यावेळी गडकरी यांनी उत्तरे दिली. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सर्व कामगार गावी गेले नाहीत  
देशातील सर्वच उद्योग व्यवसाय हे स्थलांतरित कामगारांवर चालत नाहीत. सुमारे वीस टक्के कामगार हा स्थानिक असतो. व्यवसाय सुरू झाल्यानंतर ते पुन्हा कामावर हजर होतील. मात्र त्यांच्या येण्या-जाण्याची आणि कामाच्या ठिकाणच्या सुरक्षेची उद्योजकांनी काळजी घेणे गरजेचे आहे, असेही गडकरी म्हणाले. 

देणी देण्याचा प्रश्‍न निकाली लावू 
एमएसएमईला केंद्र व राज्य सरकार यांच्यासह मोठ्या उद्योजकांकडून कोट्यवधी रुपयांचे येणे बाकी आहे. ते लवकरात लवकर देण्याचे प्रयत्न सुरू असून मोठ्या उद्योजकांना त्याबाबतच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत. बँकांबाबत असलेल्या तक्रारी आम्हाला कळवाव्यात. त्या 35 दिवसांत निकाली लावण्याचा प्रयत्न असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PPE kits sanitizers are now on the path to export says nitin gadkari