देशाची बाजारपेठ ‘तनिष्का’ जिंकू शकतात!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

‘‘नव्या कल्पना योग्यरीत्या राबवल्या, तर तुमच्या उत्पादनाला मागणीच मागणी येऊ शकते, त्यामुळे तुम्ही महिला देशाची बाजारपेठ जिंकू शकता,’’ अशा शब्दांत मार्केटिंग क्षेत्रातील तज्ज्ञ, रूरल रिलेशन्सचे प्रमुख प्रदीप लोखंडे यांनी ‘तनिष्कां’ना प्रेरणा दिली.

पुणे-  ‘‘नव्या कल्पना योग्यरीत्या राबवल्या, तर तुमच्या उत्पादनाला मागणीच मागणी येऊ शकते, त्यामुळे तुम्ही महिला देशाची बाजारपेठ जिंकू शकता,’’ अशा शब्दांत मार्केटिंग क्षेत्रातील तज्ज्ञ, रूरल रिलेशन्सचे प्रमुख प्रदीप लोखंडे यांनी ‘तनिष्कां’ना प्रेरणा दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लोखंडे यांच्यासारख्या अनेक मान्यवरांनी विविध विषयांवर बुधवारी तनिष्का सदस्यांना मार्गदर्शन केले. निमित्त होते ‘तनिष्का संवाद २०१९’चे. माहिती आणि मनोरंजनावर आधारित दिवसभराचे संमेलन उत्साहात पार पडले. या वेळी ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, सीईओ उदय जाधव, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे विभागीय अधिकारी सुशील जाधव, सोहम उद्योगचे प्रमुख विनय गरगटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने संमेलनाचे उद्‌घाटन झाले. त्यापूर्वी मैत्रयी निर्गुण आणि समृद्धी पुजारी यांनी नृत्यातून गणेशवंदना सादर केली. तनिष्कांना देशी झाडांच्या १२ लाख बिया मोफत पुरवल्याबद्दल वृक्षमित्र महेंद्र घागरे यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी अभिजित पवार म्हणाले, ‘‘तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून राज्यातील महिलांनी एकत्र येऊन अनेक प्रकल्प राबविले आहेत. या कामांतून यशोगाथा निर्माण झाल्याने समाजाचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. महिलांच्या क्षमता- व्यक्तिमत्त्व विकासासाठी तनिष्कांतर्गत उपक्रम- प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात. विद्यार्थ्यांमध्ये प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता निर्माण व्हावी, यासाठी इस्राईलला अवघड परीक्षा घेतात. अपयशानंतर खूप अभ्यासाने परीक्षेत यश मिळते. तेथे हे अपयश साजरे केले जाते. अपयशानंतर यशाकडे जाण्याचे लक्षात ठेवले पाहिले.’’ समाजात, व्यवसायात वेगळे करू बघणाऱ्या तनिष्कांना ‘मजेत जगावं कसं?’ या विषयावर लेखक शिवराज गोर्ले यांनी  मार्गदर्शन केले. 

पर्यावरण आणि स्त्रिया-मुले याविषयी उद्योजिका चित्रलेखा वैद्य म्हणाल्या, ‘‘विषारी कीटकनाशके फवारली जात आहेत, त्यामुळे भाज्या, धान्यासह जमीन, पाणी सर्वच विषारी होत आहे. त्याचे परिणाम आरोग्यावर होतात. महिलांनी प्लॅस्टिकमुक्त पॅकेजिंग, पर्यावरणपूरक सेंद्रिय वस्तू, सौंदर्यप्रसाधने यांसारखे व्यवसाय सुरू करावेत.’’ महिलांमध्ये प्रचंड आंतरिक शक्ती असते. नकारात्मक विचार कराल, तर तसेच होणार. अंधश्रद्धा बाळगू नका, सकारात्मक विचार करा, असे वास्तुशास्त्रातील तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांनी सांगितले. मनाची ताकद वाढवण्याच्या प्रात्यक्षिकाला तनिष्कांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमासाठी पुणे, सातारा जिल्ह्यातील तनिष्का सदस्या उपस्थित होत्या. फुलांच्या रांगोळ्या, सोनचाफ्याच्या फुलांची भेट, सनई- सरोदच्या सुरावटीत तनिष्कांचे स्वागत केले. कृष्णा पर्लतर्फे भेट म्हणून कूपन देण्यात आली. या कार्यक्रमासाठी लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी आणि सोहम उद्योग यांचे प्रायोजकत्व होते. पल्लवी चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pradeep Lokhande Head of Rural Relations Expert in Marketing says Women can win the country's market

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: