परिस्थिती बदलली तरी उद्योगांसमोर आव्हाने

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

‘जागतिकीकरणानंतर उद्योग व्यवसायात मोठे बदल झाले. उद्योगांसाठी सरकारी धोरणे चांगली असली तरी त्यांची अंमलबजाणी योग्य प्रकारे होत नाही. परदेशी गुंतवणुकीमुळे बांधकाम क्षेत्राला चालना मिळाली. मात्र पूर्वीची व आताची परिस्थिती बदलली तरी उद्योगातील आव्हाने कायम आहेत,’’ असे मत ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार आणि मगरपट्टा सिटीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर यांनी मंगळवारी व्यक्त केले.

पुणे - ‘जागतिकीकरणानंतर उद्योग व्यवसायात मोठे बदल झाले. उद्योगांसाठी सरकारी धोरणे चांगली असली तरी त्यांची अंमलबजाणी योग्य प्रकारे होत नाही. परदेशी गुंतवणुकीमुळे बांधकाम क्षेत्राला चालना मिळाली. मात्र पूर्वीची व आताची परिस्थिती बदलली तरी उद्योगातील आव्हाने कायम आहेत,’’ असे मत ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार आणि मगरपट्टा सिटीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर यांनी मंगळवारी व्यक्त केले. 

रोटरी क्‍लब ऑफ टिळक रोड यांच्या वतीने अप्पासाहेब सावळे स्मृती व्याख्यानमालेचे २९ वे पुष्प गुंफण्यात आले. या वेळी पवार आणि मगर यांची ‘उद्योग ः भूतकाळ, सद्यःस्थिती, भविष्य, तसेच आताची स्थिती, आव्हाने आणि चिंता’ या विषयावर क्‍लबचे माजी अध्यक्ष अनंत सरदेशमुख यांनी मुलाखत घेतली. 

डिस्ट्रिक्‍ट गव्हर्नर इलेक्‍ट रवी धोत्रे, क्‍लबचे अध्यक्ष श्रीकांत सरपोतदार आणि चंद्रकांत डांगे या वेळी उपस्थित होते. टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या पद्मजी हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. गेल्या ४० वर्षांत उद्योगात झालेल्या अनेक बदलांचा प्रवास पवार आणि मगर यांनी उलगडला. 

सरदेशमुख यांच्या अनेक प्रश्‍नांना उत्तर देताना पवार म्हणाले, ‘‘स्पर्धा वाढल्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाची उत्पादने करणे भाग पडले. त्यामुळे उद्योग क्षेत्र वाढले. उद्योगात अद्ययावतपणा आला तर बेरोजगारी वाढेल, अशी चर्चा होती. मात्र, आपण तंत्रज्ञानात मागे पडू याचा कोणी विचारच करीत नव्हते.’’ ‘‘भ्रष्टाचार, सरकारी धोरणे आणि खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीबाबतच्या प्रश्‍नावर पवार म्हणाले, ‘विकासात भ्रष्टाचाराचा अडथळा आहे. मात्र लोकसंख्येचा विचार करता आजही देशात प्रचंड संधी आहेत. मते मिळविण्यासाठी जातीय भावनांचा होणारा वापर चुकीचा आहे. जातीयवाद आणि व्यक्तिगत टीकेपेक्षा प्रत्येक पक्षाने आपला अजेंडा काय आहे, यावर मते मिळवावीत.’’ 

सतीश मगर म्हणाले, पूर्वी अर्थबळ असलेल्या व्यक्तीच या क्षेत्रात होत्या. मात्र, १९९० मध्ये बॅंकांनी धोरणात बदल केल्याने व्यवसायाला गती मिळाली. ‘रेरा’मुळे हा व्यवसाय पारदर्शक झाला. पुणे हे मध्यमवर्गीयांचे शहर आहे. महागडी घरे घेणाऱ्यांचे प्रमाण २ ते ३ टक्के आहे. कॉर्पोरेट कंपन्यांनी सर्व्हे केल्यानंतर ग्राहकांच्या गरजेनुसार प्रकल्प उभारण्यात येतात. गुंतवणूकदारांचे बंगळूरला प्राधान्य आहे. त्यानंतर पुण्याचा नंबर लागतो. सुजाता करंजकर यांनी सूत्रसंचालन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prataprao pawar Satish Magar Business Challenge Interview