'सकाळ'चे कर्मचारी प्रविण ताकवले यांचे राजस्थानमध्ये अपघाती निधन

 Pravin Takawale Killed In Road accident in rajasthan
Pravin Takawale Killed In Road accident in rajasthan

पुणे - ‘अॅग्रोवन'चे मुख्य आर्टिस्ट प्रवीण ताकवले (वय 30) यांचे मंगळवारी (ता. 21) रात्री राजस्थानातील नागौर-जोधपूर राष्ट्रीय महामार्गावरील नागडी गावाजवळ ट्रकने दिलेल्या धडकेत अपघाती निधन झाले. ताकवले काश्‍मीर ते कोल्हापूर या सायकल भ्रमंती मोहिमेदरम्यान राजस्थानात गेले होते. ताकवले यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील, बहीण आणि भाऊ असा परिवार आहे. 

ताकवले व त्यांच्या सहकाऱ्यांनी जम्मू येथून 13 ऑगस्ट रोजी काश्‍मीर ते कोल्हापूर सायकल मोहिमेला सुरवात केली होती. या मोहिमेत एकूण नऊ सायकलस्वार सहभागी झाले होते. ते मंगळवारी बिकानेरहून जोधपूरला चालले होते. ताकवले आणि त्यांचे तीन सहकारी रात्री नागडी गावाजवळील एका हॉटेलमध्ये जेवण करून पेट्रोल पंपावर ठेवलेल्या सायकली आणण्यासाठी चालत निघाले होते. तेव्हा चालकाचे नियंत्रण सुटलेला भरधाव ट्रक रस्ता सोडून खाली घुसला आणि त्याने या चौघांना पाठीमागून धडक दिली. त्यात ताकवले जागीच ठार झाले; तर इतर तिघेजण जखमी झाले. पोलिसांनी जखमींना खिंवसर इस्पितळात दाखल केले. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे. 

ताकवले आठ वर्षांपासून सकाळ समूहामध्ये कार्यरत होते. अभिनव कला महाविद्यालयातून पदवी प्राप्त केलेल्या ताकवले यांचा उत्कृष्ट डिझायनर आणि लोगो आर्टिस्ट म्हणून लौकिक होता. तसेच ते उत्तम ट्रेकर, धावपटू, जलतरणपटू आणि सायकलपटू होते. त्यांनी अनेक मॅरेथॉन स्पर्धांत सहभाग घेतला होता. ते दोन वर्षांपूर्वी पुणे ते कन्याकुमारी सायकल मोहिमेमध्येही सहभागी झाले होते. पर्यावरणरक्षण व आरोग्यसंवर्धनासाठी लोकांनी घरून कार्यालयात येण्या-जाण्यासाठी सायकलचा वापर करावा, यासाठी ताकवले यांनी सायक्लोथॉन ही मोहीमही सुरू केली होती. ते स्वतः कार्यालयात येण्या-जाण्यासाठी कटाक्षाने सायकलचा वापर करत. एक उमदा, मनमिळाऊ कलावंत आणि जिद्दी खेळाडू काळाने हिरावून घेतला, अशी हळहळ व्यक्त होत आहे. ताकवले यांचे पार्थिव आज (ता. 23) दुपारी पुण्यात आणले जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com