

प्रसन्नचित्त
सदराचे नाव- मोकळे व्हा
लेखक- डॉ. स्मिता जोशी
ईमेल हा लावा- connect.nati@gmail.com
-------------------
लग्नाआधीची चर्चा
--------------------
प्रश्न :
माझे लग्नाचे वय झाले आहे आणि मला लग्न करायचेही आहे. पण लग्नानंतर मतभेद झाले आणि नाते टिकले नाही तर काय, याची मला भीती वाटते. माझ्या काही मित्रांचे वैवाहिक संबंध तुटले असून त्यानंतर त्यांना मोठ्या आर्थिक मागण्यांना सामोरे जावे लागले. त्यामुळे लग्नाबद्दल माझ्या मनात एक प्रकारची भीती आहे. मला कोणत्या मुलीवर किंवा तिच्या कुटुंबावर अविश्वास दाखवायचा नाही. पण लग्नापूर्वी दोघांनी आर्थिक बाबी, मालमत्ता, कर्ज, भविष्यातील जबाबदाऱ्या आणि घटस्फोटाच्या परिस्थितीत आर्थिक हक्क यांबाबत स्पष्टता ठेवावी असे मला वाटते. त्यासाठी ‘प्रीनप्च्युअल अग्रीमेंट’- म्हणजे लग्नापूर्वीचा करार करतात. तो केल्यास भविष्यातील आर्थिक वाद टाळता येतील का? हा करार भारतात कायदेशीरदृष्ट्या कितपत उपयोगी आहे? लग्नापूर्वी अशा विषयांवर चर्चा योग्य आहे का?
उत्तर : काही मित्रांचे अनुभव पाहिल्यानंतर ‘उद्या माझ्या बाबतीत असे झाले तर?’ हा विचार मनात येणे स्वाभाविक आहे. पण इतरांच्या वैवाहिक अनुभवांना स्वतःच्या होणाऱ्या विवाहाचे भविष्य समजणे योग्य नाही.
लग्न म्हणजे केवळ भावनिक नाते नाही. त्यात आर्थिक जबाबदाऱ्या, कुटुंब, मालमत्ता, कर्ज, करिअर आणि भविष्यातील अनेक निर्णय असतात. त्यामुळे लग्नापूर्वी या विषयांवर दोघांनी मोकळेपणाने चर्चा करणे नक्कीच चांगले. ‘प्रीनप अग्रीमेंट’ करण्याचा विचारही पूर्णपणे चुकीचा नाही. पण भारतात अशा कराराची कायदेशीर अंमलबजावणी अनेक बाबतींत मर्यादित आणि परिस्थितीनुसार असू शकते. विशेषतः भविष्यातील पोटगी, देखभाल खर्च किंवा इतर वैवाहिक हक्क, यांबाबत ‘घटस्फोट झाला तर पत्नीला काहीही मिळणार नाही’ किंवा ‘केवळ अमुक रक्कम मिळेल’ अशी अट करून भविष्यातील न्यायालयीन अधिकार निश्चितपणे संपवता येतील, असे समजणे योग्य नाही. वैवाहिक वाद निर्माण झाल्यास संबंधित कायदे आणि त्या वेळची परिस्थिती न्यायालय विचारात घेऊ शकते. म्हणून असा करार करायचा असल्यास तो दोघांच्या स्वेच्छेने, पूर्ण माहिती देऊन आणि स्वतंत्र कायदेशीर सल्ल्याने तयार करणे योग्य ठरेल. त्यात लग्नापूर्वीची मालमत्ता, कर्जे, आर्थिक योगदान, संयुक्त मालमत्ता आणि इतर आर्थिक बाबींविषयी स्पष्टता ठेवता येऊ शकते; मात्र वैवाहिक हक्कांबाबतच्या प्रत्येक अटीची कायदेशीर वैधता गृहीत धरता येणार नाही.
समुपदेशक म्हणून यापेक्षा एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते- लग्नाआधी करारापेक्षा संवादाचा पाया मजबूत कर. समोरच्या व्यक्तीशी पैसा, करिअर, कुटुंबीयांची जबाबदारी, राहण्याची व्यवस्था, मुलांविषयीचे विचार, आर्थिक स्वातंत्र्य आणि भविष्यातील अपेक्षा याबद्दल स्पष्ट बोल. लग्नाची सुरुवातच ‘उद्या घटस्फोट झाला तर माझे किती नुकसान होईल?’ या भीतीने करू नकोस. सावध राहणे योग्य आहे; पण भीतीमुळे चांगले नाते निर्माण करण्याची संधी गमावू नकोस. करारापेक्षा परस्पर विश्वास, स्पष्ट संवाद आणि जबाबदारीची जाणीव हे वैवाहिक नात्याचे अधिक मजबूत संरक्षण आहे.
प्रश्न : मी २८ वर्षांची असून माझे लग्न ठरले आहे. होणाऱ्या पतीची व माझी चांगली ओळख झाली आहे आणि तो मला आवडतो. माझ्या आई-वडिलांनी त्याची निवड केली आहे. या नात्याबद्दल मला सकारात्मकता वाटते. पण माझ्या भूतकाळाबद्दल एक गोष्ट सतत अस्वस्थ करते. काही वर्षांपूर्वी माझे एका मुलावर प्रेम होते. मला त्याच्याशी लग्न करायचे होते आणि आम्ही सुमारे तीन महिने ‘लिव्ह इन’मध्ये राहिलो. माझ्या आई-वडिलांना ते लग्न मान्य नव्हते. त्यांच्या दबावामुळे मी त्या नात्यातून बाहेर पडून पुन्हा घरी आले. नंतर त्या मुलाचा स्वभाव आणि आमच्या नात्यातील काही गोष्टी माझ्यासुद्धा लक्षात आल्या आणि ते नाते माझ्यासाठी योग्य नव्हते याची जाणीव झाली.
माझ्या होणाऱ्या पतीला मी भूतकाळाबद्दल काही सांगू नये असे आई-वडिलांना वाटते. पण माझ्या मते ज्याच्यासह आयुष्य घालवायचे आहे, त्याच्यापासून अशी महत्त्वाची गोष्ट लपवून लग्न करणे योग्य नाही. माझा भूतकाळ संपला आहे. पण तो त्याला पूर्णपणे सांगितला तर त्याचा माझ्या होणाऱ्या नात्यावर परिणाम होईल का, याची भीती वाटते. मी काय करावे?
उत्तर : तुझ्या मनातला प्रश्न केवळ ‘भूतकाळ सांगायचा की नाही?’ एवढाच नाही. ‘मी माझ्या होणाऱ्या जोडीदारासमोर पूर्णपणे प्रामाणिक राहू शकते का?’ हा अधिक महत्त्वाचा प्रश्न आहे.
तुझा भूतकाळ तुला दोषी ठरवत नाही. तू कोणावर प्रेम केलेस, त्या व्यक्तीबरोबर काही काळ राहिलीस आणि नंतर ते नाते योग्य नसल्याचे जाणवून त्यातून बाहेर पडलीस- ही तुझ्या आयुष्यातील एक घटना आहे. आज तू त्या नात्यात नाहीस आणि पुढे जाण्यास तयार आहेस, ही महत्त्वाची बाब. पण लग्नाआधी महत्त्वाच्या गोष्टी लपवून ठेवणे आणि लग्नानंतर त्या समोर येणे- यांमुळे नात्यात ‘तू मला आधी का सांगितले नाहीस?’ हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे.
याचा अर्थ असा नाही, की तुझ्या भूतकाळातील प्रत्येक तपशील होणाऱ्या पतीला सांगणे आवश्यक आहे. प्रामाणिकपणा आणि अति-तपशील यांत फरक आहे. तुला तुझ्या भूतकाळाबद्दल आवश्यक तेवढे स्पष्टपणे सांगता येईल- तुझे पूर्वी प्रेमसंबंध होते, त्या नात्यात तुम्ही काही काळ एकत्र राहत होतात, ते नाते संपले आहे आणि आज त्या व्यक्तीशी तुझे कोणतेही नाते नाही. यांपेक्षा अधिक वैयक्तिक किंवा अंतरंग तपशील सांगणे आवश्यक आहे असे नाही. हा खुलासा लग्न ठरल्यानंतर शेवटच्या क्षणी किंवा लग्न झाल्यानंतर न करता, निर्णय घेण्यासाठी पुरेसा वेळ असताना करणे योग्य. भावी जोडीदाराला ही माहिती स्वीकारण्यासाठी, प्रश्न विचारण्यासाठी आणि स्वतःचा निर्णय घेण्यासाठी मोकळीक असली पाहिजे.
तू त्याच्याशी बोलताना असे म्हणू शकतेस- ‘माझ्या आयुष्यात लग्नाआधी एक नातं होतं. त्या व्यक्तीशी मला लग्न करायचं होतं आणि आम्ही काही काळ एकत्रही राहिलो होतो. पण ते नातं माझ्यासाठी योग्य नव्हतं आणि ते पूर्णपणे संपलेलं आहे. आज मी त्या नात्यातून पुढे आले आहे. ही महत्त्वाची गोष्ट लपवून मला लग्न करायचं नाही, म्हणून मी तुला हे स्वतः सांगत आहे. माझ्या भूतकाळाचा आदर करताना तू माझ्या वर्तमानाकडेही पाहावंस, एवढीच माझी अपेक्षा आहे.’ हे ऐकल्यानंतर तो काय निर्णय घेतो, यावर तुझे नियंत्रण नाही. पण तू प्रामाणिक राहण्याचा निर्णय घेऊ शकतेस.
तुझ्या आई-वडिलांनाही हे समजणे गरजेचे आहे, की मुलीचे लग्न टिकवण्यासाठी एखादी महत्त्वाची गोष्ट लपवणे हा सुरक्षित मार्ग नाही. सत्य सांगितल्यामुळे एखादे नाते तुटले तर ते दुःखद असेल; पण लपवलेल्या सत्यामुळे लग्नानंतर विश्वास तुटणे अधिक वेदनादायक ठरू शकते.
तुझा भूतकाळ हा तुझ्या वर्तमानावरचा शिक्का नाही. भूतकाळ स्वीकार, त्यातून शीक आणि वर्तमानात प्रामाणिक राहून भविष्य घडव. लग्नाची सुरुवात जर प्रामाणिकपणाने झाली, तर नात्याचा पाया अधिक मजबूत राहतो.
------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.