

PNE26W55004
सोलापूर : डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात प्रिसिजन वाचन अभियानात शिरीष कणेकरांच्या लेखांचे अभिवाचन सादर करणारे कलावंत.
कणेकरांच्या लेखणीचा रंगमंचावर जलवा
प्रिसिजन वाचन अभियानाची रंगतदार मैफल; अभिवाचनातून उलगडला मिश्कील, मार्मिक लेखनप्रवास
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ४ : सचिन तेंडुलकरांची फटकेबाजी, सीकेपीच्या घरातील खाद्यसंस्कृती, डॉ. काशिनाथ घाणेकरांची मैत्री आणि अमीन सयानी यांच्या आठवणी... शिरीष कणेकरांच्या विविध लेखांचे अभिवाचन करत कलावंतांनी रसिकांसमोर त्यांच्या लेखनाचे विविध रंग उलगडले. डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात झालेल्या प्रिसिजन वाचन अभियानाच्या मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
व्यंग, मिश्कीलपणा, चित्रमयता आणि मार्मिकता यांचा सुरेख मिलाफ असलेली कणेकरांची स्वतंत्र लेखनशैली ‘कणेकरी शैली’ म्हणून ओळखली जाते. लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, दादा कोंडके, आशा भोसले आणि अमीन सयानी अशा दिग्गजांशी असलेला त्यांचा स्नेह त्यांच्या लेखनातून व्यक्त झाला.
संजय मोने, प्रसाद फणसे, विजय केंकरे आणि उदय सबनीस यांनी कणेकरांच्या विविध लेखांचे दमदार अभिवाचन केले. आवाजातील चढ-उतार, शब्दांवरील नेमका भर आणि प्रसंगानुरूप अभिनयामुळे अभिवाचनाला वाचिक अभिनयाची रंगत आली.
कणेकरांच्या सीकेपीविषयक लेखनातील घावन, सांदण आणि सुकट्याचे पोहे यांसारख्या पदार्थांचे वर्णन करताना त्यांच्या खाद्यसंस्कृतीवरील प्रेमाची झलक मिळाली. अमीन सयानी यांच्या ‘बिनाका गीतमाला’च्या आठवणी तसेच डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्यासोबतच्या मैत्रीचे विविध पैलूही अभिवाचनातून उलगडले.
कणेकरांचा मिश्कील स्वभाव, हजरजबाबीपणा, मैत्रीची ऊब आणि जीवनाकडे पाहण्याचा दिलखुलास दृष्टिकोन या आठवणींतून रसिकांसमोर आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांच्या हस्ते कलाकारांचे स्वागत झाले. माधव देशपांडे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.