

फेडरेशन ऑफ प्रेस क्लब अस्तित्वात
देशभरातील प्रेस क्लबचा पुढाकार
नवी दिल्ली, ता. २४ (पीटीआय) : देशातील विविध राज्यांमधील जाणाऱ्या प्रेस क्लबना एकत्र आणण्यासाठी आणि काम करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च संघटना म्हणून फेडरेशन ऑफ प्रेस क्लब (एफपीसी) या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या महासंघाची नोंदणी सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट, १८६० अंतर्गत करण्यात आली आहे.
या महासंघाचे संस्थापक सदस्य म्हणून प्रेस क्लब ऑफ इंडिया, मुंबई प्रेस क्लब, प्रेस क्लब कोलकता, प्रेस क्लब हैदराबाद, चंडीगड प्रेस क्लब, स्टेट प्रेस क्लब मध्य प्रदेश, गुवाहाटी प्रेस क्लब आणि आगरताळा प्रेस क्लब यांचा समावेश आहे. ‘एफपीसी’च्या १० सदस्यीय नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून गौतम लाहिरी यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी स्नेहाशिष सूर, समर खडस आणि विजय रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महासंघाचे सरचिटणीस म्हणून सौरभ दुग्गल यांची निवड झाली असून, सहायक सरचिटणीसपदी संगीता बरुआ पिशारोटी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर माजी सरचिटणीस नीरज ठाकूर यांच्याकडे कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रवीण खारिवाल, प्रणब सरकार आणि खागेन कलिता यांचा समावेश आहे. महासंघाच्या नियामक मंडळाची पहिली बैठक नुकतीच प्रेस क्लब ऑफ इंडिया येथे पार पडली. देशभरातील पत्रकार संघटनांना एक व्यापक आणि सामूहिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच माध्यम क्षेत्राशी संबंधित प्रश्नांवर राष्ट्रीय स्तरावर एकसंध भूमिका मांडणे, हा या महासंघाच्या स्थापनेमागील प्रमुख उद्देश आहे.