पुणे : मुख्यसभेनंतर हजेरी लावण्यासाठी नगरसेवकाची दादागिरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Municipal Corporation
पुणे : मुख्यसभेनंतर हजेरी लावण्यासाठी नगरसेवकाची दादागिरी

पुणे : मुख्यसभेनंतर हजेरी लावण्यासाठी नगरसेवकाची दादागिरी

पुणे - मुख्यसभा (Meeting) संपल्यानंतरही उपस्थितीच्या मस्टरवर स्वाक्षरी (Signature) करू द्यावी यासाठी नगरसेवकांकडून (Corporator) नगरसचिव कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर दादागिरी केली जात असल्याचा प्रकार महापालिकेत (Municipal) घडला आहे.

महापालिकेची मुख्यसभा सुरू होताना नगरसेवक स्वाक्षरी करून जागेवर बसतात. मुख्यसभा लवकर तहकूब झाली तर काही वेळ स्वाक्षरीसाठी मस्टर सभागृहात ठेवले जाते. सभाकामकाज नियमानुसार नगरसेवकांना प्रत्येक सभेसाठी १०० रुपये मानधन मिळते व एका महिन्यात जास्तीत जास्त चार सभांचेच मानधन मिळते. मानधन व उपस्थिती लागण्यासाठी या मस्टरवर स्वाक्षरी असणे आवश्‍यक असते.

महापालिकेची मुख्यसभा नुकतीच झाली. ही सभा संपल्यानंतर काही नगरसेवक स्वाक्षरी करण्यासाठी नगरसचिव कार्यालयात गेले. त्यांना नियम सांगितल्यानंतर ते परत गेले. पण जवळपास दीड तासाने एका नगरसेवक स्वाक्षरी करण्यासाठी कार्यकर्त्यांसह नगरसचिव कार्यालयात गेले. पण त्यांच्या नावापुढे फुली मारल्याचे बघून या नगरसेवकाने तेथेच कर्मचाऱ्यांना अरेरावीची भाषा सुरू केली. त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरी हा नगरसेवक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यांना संबंधित कर्मचाऱ्यास खाली फेकून देईन अशी धमकीही दिली. त्यामुळे उपस्थितांमध्ये खळबळ उडाली. दरम्यान, हा नगरसेवक ज्येष्ठ असून, विधानसभेची निवडणूकही लढवली आहे, त्यांच्याकडून अशाप्रकारेच वर्तन झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.