

पिंपरी, ता. १६ : घराबाहेर, सोसायटी परिसरात, दुकानासमोर अथवा रस्त्यालगत दुचाकी उभी करून नागरिक आपापल्या कामासाठी निघून जातात. मात्र, काहीवेळाने परतल्यानंतर दुचाकी जागेवर नसल्याचे निदर्शनास येते. दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे वाहनधारकांची चिंता वाढली आहे. विशेषतः गर्दीच्या ठिकाणी तसेच रस्त्यालगत उभी केलेली वाहने चोरट्यांच्या निशाण्यावर येत आहेत. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत तब्बल ६०७ दुचाकी चोरीला गेल्या आहेत.
शहरातील विविध भागांत दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत असल्याचे पोलिस ठाण्यांमध्ये दाखल होणाऱ्या तक्रारींवरून स्पष्ट होते. वाहनधारकाने काही मिनिटांसाठी दुचाकी उभी केली असली तरी चोरट्यांना संधी मिळाल्यास ते काही क्षणांत वाहन घेऊन पसार होतात. त्यामुळे रस्त्यालगत अथवा इतर ठिकाणी उभी केलेली ‘आपली दुचाकी सुरक्षित आहे’ असा समज वाहनधारकांनी ठेवणे धोकादायक ठरत आहे.
रस्त्यालगतची वाहने चोरट्यांच्या रडारवर
काही वाहनधारक हँडल लॉक करण्याकडे दुर्लक्ष करतात. अशा वाहनांवर चोरट्यांची नजर असते. वाहनधारक काही मिनिटांसाठी दूर गेल्यानंतर चोरटे संधी साधून वाहन लंपास करतात. तसेच काही दुचाकींचे लॉक तोडूनही दुचाकी लंपास केली जाते.
चोरट्यांचे ‘उद्योग’
शहराच्या विविध भागांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. मात्र, चोरटे चेहरा झाकणे, नंबर प्लेटमध्ये फेरफार करणे किंवा चोरीचे वाहन तातडीने दुसऱ्या ठिकाणी नेणे अशा पद्धतींचा वापर करतात. त्यामुळे चोरीनंतर वाहनाचा माग काढणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरते. काही प्रकरणांमध्ये सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस चोरट्यांचा शोध घेतात.
पार्किंगची निश्चित जागा नसल्यानेही धोका
शहरातील अनेक भागांत पुरेशी अधिकृत पार्किंग व्यवस्था नसल्याने नागरिकांना रस्त्याच्याकडेला किंवा उपलब्ध जागेत दुचाकी उभी करावी लागते. अशा ठिकाणी वाहनांच्या सुरक्षेची कोणतीही व्यवस्था नसते. परिणामी, वाहन चोरीबरोबरच वाहनातील वस्तू चोरी जाण्याचाही धोका वाढतो.
ही घ्या काळजी
- दुचाकी शक्यतो अधिकृत व सुरक्षित पार्किंगमध्येच उभी करावी
- वाहन सोडताना हँडल लॉक करणे आवश्यक
- शक्य असल्यास अतिरिक्त डिस्क लॉक किंवा सुरक्षितता उपकरणाचा वापर करावा
- दुचाकी बराचवेळ एकाच ठिकाणी उभी ठेवणे टाळावे
- वाहनाची आरसी, विमा, नोंदणी क्रमांकाची प्रत सुरक्षित ठेवावी
- तत्काळ पोलिसात तक्रार द्यावी
चोरीच्या घटना
महिना ः दुचाकी ः तीन चाकी ः चारचाकी
जानेवारी ः १०७ ः ०४ ः ०७
फेब्रुवारी ः ८९ ः ०५ ः ०३
मार्च ः ७९ ः १४ ः ०५
एप्रिल ः ६२ ः ०९ ः ०४
मे ः ८४ ः ०२ ः ०७
जून ः ८८ ः ०७ ः ०७
जुलै ः ९८ ः १० ः ०५
‘‘वाहन चोरीच्या घटना थांबविण्यासाठी गस्त वाढवली आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी गुन्हे शाखेच्या पथकांना विशेष सूचना दिलेल्या आहेत. घटनास्थळाची पाहणी करून सखोल तपास करीत वाहनचोरांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. अनेक गुन्हेगार बाहेरील जिल्ह्यांतील असल्याचे समोर येते. या घटना रोखण्यासाठी घटनेच्या मुळापर्यंत जाऊन तपास केला जात आहे. मागील काही दिवसांत गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण अधिक आहे.
- रोहिदास पवार, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.