गणेशोत्सव2019 : उत्सवात प्रथमच कैद्यांचे ढोल पथक  

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

कैद्यांच्या ढोल पथकाचा ताल ऐकण्याची संधी प्रथमच पुणेकरांना मिळणार आहे. मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम मंडळाच्या रथापुढे कारागृहातील हे कैदी ढोल-ताशा वाजवून गणेशचरणी आपली सेवा अर्पण करणार आहेत. 

पुणे - कैद्यांच्या ढोल पथकाचा ताल ऐकण्याची संधी प्रथमच पुणेकरांना मिळणार आहे. मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम मंडळाच्या रथापुढे कारागृहातील हे कैदी ढोल-ताशा वाजवून गणेशचरणी आपली सेवा अर्पण करणार आहेत. 

गणपती प्रतिष्ठापना आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये नावीन्यपूर्ण, ठेक्‍यामध्ये वादन करण्यासाठी दीड- दोन महिने शहरातील शेकडो ढोल ताशा पथके सराव करत असतात. त्यात सहभागी होण्यासाठी तरुण-तरुणी प्रचंड उत्साही असल्याने पथकांची संख्याही दरवर्षी वाढत चालली आहे. सोमवारी (ता. २) शहराच्या विविध भागांत निघणाऱ्या गणपती बाप्पांच्या स्वागताच्या मिरवणुकीत बहुतांश ढोल ताशा पथकेच असतात. मात्र, यंदा पुण्याच्या गणेशोत्सवाच्या इतिहासात प्रथमच येरवडा खुल्या कारागृहातील कैद्यांचे ढोल ताशा पथक स्वागताच्या मिरवणुकीत सहभागी होणार आहे. ही गणेशभक्तांसाठी वेगळेपण व पर्वणी ठरणार आहे. 

नादब्रह्म पथकाचे प्रमुख अतुल बेहरे म्हणाले, ‘‘गणेशोत्सवाच्या इतिहासात प्रथमच येरवडा कारागृहातील कैदी गणपतीच्या मिरवणुकीमध्ये ढोल ताशा वादन करणार आहेत.’’ 

पथकात ३० कैदी
कारागृह विभागाचे प्रमुख सुनील रामानंद यांनी कैदी बांधवांना ढोल ताशा वाजविण्याचे प्रशिक्षण देण्याची कल्पना मांडली. त्यानुसार नादब्रह्म ढोल ताशा पथकाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी हे आव्हान स्वीकारले. गेले २५ दिवस येरवडा खुल्या कारागृहात कैद्यांना प्रशिक्षण दिले आहे. त्यांना भजनी ठेक्‍यासह पाच ते सहा ठेके वाजवण्यास शिकविले आहे. या पथकांमध्ये ३० कैदी बांधवांचा समावेश असून, त्यातील दोघेजण हे ताशा वाजविणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prisoners Dhol Pathak for the first time at Ganesh festival