सावकारीचा पाश ठरतोय गळफास

Money-Lender-Loan
Money-Lender-Loan

पुणे - व्यवसाय करण्यासाठी शैलेशने (नाव बदलले आहे) खासगी सावकाराकडून कर्ज घेतले. व्यवसाय तोट्यात गेला, त्यामुळे कर्जाचा हप्ता फेडणे शक्‍य झाले नाही. दिवसेंदिवस व्याजाचा डोंगर वाढत गेला. खासगी सावकाराकडून पैशांसाठी तगादा सुरू झाला, धमक्‍याही आल्या. या सगळ्या प्रकाराला कंटाळून शैलेशने आपल्या दोन मुली, पत्नीसह स्वतः आत्महत्या केली. एवढेच नाही, तर सावकारी कर्ज फेडण्यासाठी स्वतःच्या मुलीला देहविक्रय करायला लावल्याचे धक्कादायक चित्र पुढे आले आहे. खासगी सावकारीचे काही जण अक्षरशः शिकार झाले असून, अनेक जण आत्महत्येच्या वाटेवर असल्याचे भयावह वास्तव आहे.

घर बांधणे किंवा फ्लॅट खरेदी, मुलांचे शिक्षण, कोर्ट-कचेऱ्या, तर कधी वृद्धांच्या औषधोपचारांसाठी ऐनवेळी लागणारे पैसे नेमके आणायचे कोठून, असा प्रश्‍न अनेकांना पडतो. मग कोणत्या तरी ओळखीच्या माणसाच्या माध्यमातून जवळपासच्या खासगी सावकाराकडे नडलेली व्यक्ती जाते. त्याच्याकडून काही रक्कम व्याजाने घेते. या कर्जातून त्या वेळेपुरता प्रश्‍न सुटतो. परंतु या घेतलेल्या कर्जाचे मुद्दल तर लांब, त्याचे व्याज फेडतानाच अनेकांच्या अक्षरशः नाकीनऊ येतात. गरजेनुसार पाच ते २० टक्के इतक्‍या व्याजाने कर्ज दिले जाते. त्यानंतर त्या पैशांच्या वसुलीसाठी तगादा लावला जातो. शहरातील पाच हजारांहून अधिक कुटुंबे कर्जबाजारी असून, सध्या ती भीतीच्या छायेखाली आहेत. सावकारांच्या भीतीपोटी काही जण त्यांच्या घरी येण्यास धजावत नसल्याचे वास्तव आहे. शहरात पाच हजारांहून अधिक कुटुंबे सावकारी कर्जबाजारी झाली आहेत.

कर्जवसुलीसाठी गुन्हेगारी टोळ्या 
सावकारी कर्जाबाबत पोलिस दाद देत नाहीत. तर याऊलट सावकारी कर्ज देणाऱ्यांकडून महिलांना पुढे करून विनयभंगाचे व अन्य स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची धमकी कर्जबाजारी व्यक्तींना दिली जाते. कोरे स्टॅम्प व धनादेशांवर त्यांच्या सह्या घेऊन घरातील वस्तू जबरदस्तीने नेल्या जातात. केवळ तेवढ्यावर न थांबता गुन्हेगारी टोळ्या, सराईत गुन्हेगारांचा वापर करून जबरदस्तीने पैसे वसूल केले जातात. त्यासाठी दमदाटी, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिली जाते.

खासगी सावकारी कोणाची?
गुन्हेगारी टोळ्या, सराईत गुन्हेगार, ‘झोपडपट्टी दादा’ यांच्याकडून खासगी सावकारी धंदा सर्रासपणे चालविला जात आहे. त्यामध्ये काही राजकीय व्यक्ती, आजी माजी प्रशासकीय तसेच पोलिस अधिकारी-कर्मचारी व अन्य सरकारी नोकरदार भ्रष्टाचारातून कमाविलेला पैसा आपले कुटुंबीय किंवा ओळखीच्या व्यक्तींमामार्फत सावकारी कर्जामध्ये आणतात. त्यातून जादा व्याजदर लावून दुप्पट-तिप्पट नफा कमावितात.

व्यवसायवृद्धीसाठी मी खासगी सावकाराकडून व्याजाने कर्ज घेतले होते. मात्र ते वेळेत फेडू शकलो नाही, त्यामुळे माझ्याकडून जबरदस्तीने पैसे वसूल करण्यासाठी गुंडांकडून दबाव आणला जात आहे. त्यामुळे मी प्रचंड तणावाखाली आहे.
- बाबा लासूरकर, कर्जबाजारी व्यक्ती  

खासगी सावकारी हा प्रकार ग्रामीण भागामध्ये असतो. शहरात असा प्रकार आढळल्यास नक्कीच कारवाई केली जाईल. संबंधित खासगी सावकारांविरुद्ध कारवाई करण्यास कोणतीही अडचण येणार नाही. फक्त संबंधित कर्जबाजारी व्यक्तींनी पुढे येऊन पोलिस ठाण्यांमध्ये फिर्याद दाखल करणे आवश्‍यक आहे.
- अशोक मोराळे, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com