गुळ उद्योगाच्या समस्या सुटणार; ज्येष्ठ नेते शरद पवारांनी घातलंय लक्ष

संतोष शेंडकर
Thursday, 24 December 2020

विविध समस्या संपून शेतकऱ्यांना चांगला दर मिळू शकेल अशी आशा शरद पवार यांच्या पुढाकारामुळे निर्माण झाली आहे. 

सोमेश्वरनगर ः साखर उद्योगाचे आधारवड समजले जाणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपले लक्ष आता गुळ उद्योगातही घातले आहे. त्यांच्या सूचनेनुसार राज्यसरकारने नऊ जणांची 'गुळ समिती' स्थापन केली आहे. समितीने अभ्यासदौरेही सुरू केले आहेत. गूळउत्पादक, व्यापारी आणि ग्राहक या तिन्हींसाठी ही दिलासादायक बाब ठरणार असून निकृष्ट गुळ उत्पादनावर प्रतिबंध बसू शकणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गुळ हा महाराष्ट्राचा पारंपारिक शेतीपूरक व्यवसाय आहे. मात्र, साखरउद्योगाकडेच संपूर्ण लक्ष दिले जात होते. गुळ उद्योगासाठीही महामंडळ निर्माण करावे ही मागणी मागे पडत होती. गुळ व्यवसायात अत्याधुनिक यंत्रे आली परंतू त्याचबरोबर खराब साखर, खराब चॉकलेट, अतिरीक्त केमिकलचा करणे अशा भेसळीच्या अपप्रवृत्ती घुसल्या. कमी दरात जादा गुळ मिळू लागल्याने शुध्द गूळ उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना दरात फटका बसत आहे. दराच्या स्पर्धेत व्यापारीही बळी पडत आहे. कायदे मात्र निकृष्ट उत्पादक सोडून व्यापाऱ्यास जबाबदार धरणारे आहेत. यासह विविध समस्या संपून शेतकऱ्यांना चांगला दर मिळू शकेल अशी आशा शरद पवार यांच्या पुढाकारामुळे निर्माण झाली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पवारांच्या सूचनेनुसार राज्यसरकारच्या 'अन्न व औषध प्रशासन' विभागांतर्गत नऊ जणांची गुळ समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीमध्ये अन्नसुरक्षा अधिकारी नी. ब. खोसे सचिव आहेत तर अन्न व औषध प्रशासनातील शी. स. देसाई, ग. सु. परळीकर, शं. भा. पवार, शी. बा. कोडगीरे, जी. तु. संगत, बा. म. ठाकूर हे वरीष्ठ अधिकारी सदस्य आहेत. गुळ उत्पादक व निर्यातदार सुरेश शहा (नीरा ता. पुरंदर) आणि गुळ व्यापारी राजेंद्र गुगळे (पुणे) हे दोन अशासकीय सदस्य आहेत. 

नीरा बाजार समितीचे माजी सभापती नंदकुमार जगताप म्हणाले, चांगल्या गुळाला चांगले पैसे मिळावेत. शेतकऱ्यांना गुळ उत्पादनाचे सहज परवाने मिळावेत व बेकायदेशीर उत्पादनास प्रतिबंध करावा यासाठी आमच्या बाजार समितीकडून गूळ महामंडळ स्थापन व्हावे अशी सातत्याने मागणी होती. त्यादृष्टीने पवार साहेबांनी पावले उचलली याचे खूप समाधान आहे. साखरेसोबत गूळउत्पादकालाही ते न्याय देतील.

कडाक्‍याच्या थंडीतही आंदोलनाची धग कायम; पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच!

कामाला आला वेग- समिती सदस्य सुरेश शहा म्हणाले, सदाशिव सातव, जवाहर वाघोलीकर यांच्यासह आम्ही चार गुळ व्यवसायिक पवार साहेबांना गोविंदबागेत नुकतेच भेटलो होतो. त्यांना सर्व अभ्यास होताच त्यामुळे त्वरीत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत मुंबईत बैठक लावली. तेथील सविस्तर चर्चेनंतर आता गुळ समिती तयार झाली आहे. काही दिवसापूर्वीच सोलापूर, गडहिंग्लज, कोल्हापूर या ठिकाणी अभ्यास दौरा पार पडला. आता सांगली, कराड, केडगाव अशा ठिकाणीही भेटी देऊन समस्या जाणून घेत आहोत. साहेबांनी वैयक्तीक लक्ष घातल्यामुळे कामाला वेग आला आहे. अधिकारीही मनापासून काम करत आहेत. त्यामुळे लवकरच अंतिम धोरणापर्यंत पोहचू असा विश्वास वाटतो. शेतकरी, व्यापारी यांच्या समस्यांचे निराकरण कऱणे, गुळ व्यवसाय शुध्द कऱणे आणि ग्राहकांना दर्जेदार गूळ पोचविणे ही उद्दीष्टे आहेत.

(संपादन : सागर डी. शेलार)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the problems of jaggery industry will soon be solved says sharad pawar