संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांचे पुण्यात निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

profound scholar of saint literature dr Ramchandra Dekhne passed away in Pune

संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांचे पुण्यात निधन

पुणे : संतसाहित्याचे आणि लोकवाडःमयाचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ भारूडकार डॉ. रामचंद्र अनंत देखणे (वय ६६ वर्षे) यांचे सोमवारी सायंकाळी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

घटस्थापनेमुळे डॉ. देखणे हे शनिवार पेठेतील घरीच होते. सायंकाळी सातच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. कुटुंबियांनी तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात नेले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. डॉ. देखणे यांचा फिटनेस चांगला होता. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार होणार आहेत.

चार दिवसांपूर्वीच ते गणेश कला क्रीडामध्ये नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हास्य, आनंद आणि तत्त्वज्ञान या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता. अयोध्येजवळील नैमिषारण्य येथे प्रवचणासाठी नुकतेच जाऊन आले होते. त्याचीही आठवण त्यांनी तेथे सांगितली होती डॉ. देखणे हे पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या कार्यालयात जनसंपर्क अधिकारी होते. ३४ वर्षांच्या नोकरीनंतर ते ३० एप्रिल १४ रोजी निवृत्त झाले.

डॉ. देखणे यांच्या घरी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. वडिलांच्या कीर्तनात ते लहानपणी अजाणतेपणी टाळकरी म्हणून उभे रहात आणि खड्या आवाजात अभंगातली चरणे म्हणत. त्यामुळे कीर्तन, प्रवचन, भजन आणि भारूड या कला प्रकारांशी ते आपोआप जोडले गेले. गावच्या जत्रेत किंवा पालखी, दिंडी सोहळ्यात डॉ. देखणे वेगवेगळी सोंगे आणून भारुडे करू लागले. डॉ. देखणे हे जरी भारुडांत रंगून जात तरी त्याच्या अर्थाकडे त्यांचे लक्ष नसे. आई जेव्हा भारुडातील ’दादला नको गं बाई’ किंवा, ’नणदेचं कार्टं किरकिर करतंय’ आदी प्रतीकांचा अर्थ विचारू लागली तेव्हा त्यांनी भारुडांवर संशोधन करायला सुरुवात केली. ‘भारुड वाङमयातील तत्त्वज्ञान - संत एकनाथांच्या संदर्भातील’ या त्यांच्या प्रबंधास १९८५ मध्ये पुणे विद्यापीठाची पीएचडी पदवी मिळाली. या प्रबंधाला डॉ. मु.श्री. कानडे पुरस्कार समितीचाही पुरस्कार मिळाला आहे. डॉ. देखणे हे उत्तम वक्ते आहेत. त्यांनी गेल्या काही वर्षांत विविध विषयांवरती अनेक व्याख्याने दिली आहेत. देशविदेशांत त्यांनी केलेल्या २१००व्या भारुडाचा कार्यक्रम १४ मे २०१६ रोजी झाला होता.