
Biogas Project : बारामतीत हॉटेल व गृहनिर्माण संस्थामधून बायोगॅस निर्मितीचा नगरपालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प
बारामती : ओल्या कचऱ्याची विल्हेवाट जागेवरच लावण्याच्या दृष्टिकोनातून आता बारामती नगरपालिकेने पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. शहरातील मोठी हॉटेल्स व मोठ्या गृहनिर्माण संस्था यामध्ये ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोगॅस निर्मितीचा महत्त्वकांक्षी प्रकल्प नगरपालिका कार्यान्वित करणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये बारामती शहरातील मोठ्या हॉटेलमध्ये बायोगॅस निर्मितीची यंत्रणा कार्यान्वित केली जाणार असल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये बँक ऑफ बडोदा बायोगॅस निर्मितीसाठी ज्या यंत्रणेची आवश्यकता आहे ती यंत्रणा खरेदी करण्यासाठी 50 टक्के आर्थिक सहाय्य करणार असून उर्वरित पन्नास टक्के रक्कम संबंधित हॉटेल व सोसायटी यांनी भरायची आहे.
हॉटेल, सोसायटीमध्ये तयार होणारा ओला कचरा म्हणजेच शिळे अन्न व इतर ओला कचरा हा त्याच ठिकाणी त्या यंत्रणेमध्ये टाकून त्याच्यापासून गॅस निर्मिती केली जाणार आहे. राज्यातील पाचगणी, महाबळेश्वर यासारख्या नगरपालिकांमध्ये अशा प्रकार बायोगॅस निर्मितीचे प्रकल्प कार्यान्वित असल्याची माहिती महेश रोकडे यांनी दिली. ओल्या कचऱ्यावर जागेवरच प्रक्रिया झाल्याने या कचऱ्याची वाहतूक व कचरा शहरातील बायोगॅस प्रकल्पापर्यंत नेण्याचा ताण कमी होणार आहे. याशिवाय संबंधित हॉटेल व सोसायटी यांना बायोगॅस मोफत प्राप्त होणार आहे. बारामती शहरात सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविण्यात येणार असून कालांतराने सर्व ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचा नगरपालिकेचा मानस आहे.