शेटफळगढेतील रस्त्यांसाठी पावणेआठ कोटी निरगुडे विद्युत उपकेंद्र मंजुरीच्या अंतिम टप्प्यात

विनायक चांदगुडे 
Thursday, 24 September 2020

बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विशेष प्रयत्नातून जवळपास दहा गावांना उपयोगी पडणाऱ्या शेटफळगढे परिसरातील दोन रस्त्यांच्या कामांसाठी सात कोटी 75 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

शेटफळगढे (पुणे) : बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विशेष प्रयत्नातून जवळपास दहा गावांना उपयोगी पडणाऱ्या शेटफळगढे परिसरातील दोन रस्त्यांच्या कामांसाठी सात कोटी 75 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. तसेच सात गावच्या शेतकऱ्यांना उपयोगी असणाऱ्या निरगुडे येथील नवीन विद्युत उपकेंद्राचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

म्हसोबाची वाडी निरगुडे सिनार मास या चौदा किमी अंतरावरील रस्त्याच्या डांबरीकरण व मजबुती करणाच्या कामासाठी तीन कोटी 75 लाख रुपयांचा निधी शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून श्री.भरणे यांच्या माध्यमातून मंजूर झाला आहे. या रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच या रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. यामुळे म्हसोबाचीवाडी, निरगुडे, अकोले, पोंधवडी, भादलवाडी, डाळज या गावच्या ग्रामस्थांना बारामतीला जाण्यासाठी या रस्त्याचा प्रमुख्याने सर्वाधिक जवळचा मार्ग असल्याने उपयोग होणार आहे.
 
तसेच निरगुडे, लकडेवस्ती, लामजेवाडी, अंबरओहळ, शेटफळगढे या गावच्या ग्रामस्थांना उपयोगी पडणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून चार कोटी रुपयांचा निधी श्री.भरणे यांच्या माध्यमातून मंजूर झाला आहे. यातून चार किमी अंतराचा नव्याने रस्ता होणार आहे. यात मुरमाचा भरावा, खडीकरण, एमपीएम, कार्पेट, सीलकॉट तसेच पाच ठिकाणी पाईप टाकून पूल बांधले जाणार आहेत. याही कामाला मागील आठवड्यापासून प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. त्यामुळे मागील २५ वर्षापासून या रस्त्याची संबंधित ग्रामस्थांची असलेली मागणी श्री.भरणे यांनी पूर्ण केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

निरगुडे येथे विद्युत उपकेंद्र

या परिसरातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या निरगुडे येथील नवीन विद्युत उपकेंद्राचा प्रस्ताव राज्यमंत्री श्री. भरणे यांच्या माध्यमातून मंजुरीच्या अंतिम टप्प्यात सध्या आहे. यासाठी निरगुडे येथे अडीच एकर जागा उपलब्ध झाली आहे. यामुळे निरगुडे, म्हसोबाचीवाडी, लाकडी शेटफळगढे, लामजेवाडी, अकोले, वायसेवाडी या सात गावच्या शेतकऱ्यांना शेती पंपासाठी पूर्ण दाबाने वीज मिळण्यास या उपकेंद्राचे काम झाल्यावर मदत होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The proposal for a new power substation at Nirgude is in the final stages of approval