पुणे विद्यापीठात कायद्याचे मराठीतून धडे; विद्या परिषदेचा प्रस्ताव

ब्रिजमोहन पाटील
Sunday, 25 October 2020

‘पुणे विद्यापीठात मराठीतून विधीचे शिक्षण मिळाले, तर त्याचा मला फायदा होईल,’ असे विद्यार्थिनी आकांक्षा चौगुले हिची अपेक्षा आहे. ‘अन्य विद्यापीठांत मराठीतून कायद्याचे शिक्षण घेण्याची सुविधा आहे. पुण्यात अनेक चांगली महाविद्यालये असूनही त्यात मराठीतून शिक्षण नाही. मराठीचा पर्याय उपलब्ध झाला, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वकिली क्षेत्रात करिअरचे दार उघडे होईल,’ असे विद्यार्थी कृष्णा वाघमारे सांगत होता. लवकरच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कायद्याचे शिक्षण मराठीतून मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

पुणे - ‘पुणे विद्यापीठात मराठीतून विधीचे शिक्षण मिळाले, तर त्याचा मला फायदा होईल,’ असे विद्यार्थिनी आकांक्षा चौगुले हिची अपेक्षा आहे. ‘अन्य विद्यापीठांत मराठीतून कायद्याचे शिक्षण घेण्याची सुविधा आहे. पुण्यात अनेक चांगली महाविद्यालये असूनही त्यात मराठीतून शिक्षण नाही. मराठीचा पर्याय उपलब्ध झाला, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वकिली क्षेत्रात करिअरचे दार उघडे होईल,’ असे विद्यार्थी कृष्णा वाघमारे सांगत होता. लवकरच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कायद्याचे शिक्षण मराठीतून मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यातील बहुतांश सर्व विद्यापीठांमध्ये विधीचा (लॉ) अभ्यासक्रम मराठीतून शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना दिली जाते. मात्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यीपाठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध नाही. पुढील महिन्यात होणाऱ्या विद्या परिषदेच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे २०२०-२१ मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येईल.
न्यायालयातील कामकाज हे स्थानिक भाषेतून चालावे, असे निर्देश आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. मात्र, पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये ‘विधी’ पदवीचे शिक्षण केवळ इंग्रजीतून मिळते. इंग्रजी भाषेच्या अडथळ्यामुळे विधी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होत नाही. अनेक जण हे शिक्षण अर्धवट सोडून देतात. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये वकील होण्याची क्षमता आहे. त्यांना मराठीतून शिक्षण मिळावे, यासाठी गेल्या काही वर्षांपासून कायम मागणी केली जात होती. लवकरच पुणे विद्यापीठात मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध होण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विद्यीपाठाच्या विद्या परिषदेची बैठक ३ नोव्हेंबर रोजी होणार असून, हा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे. त्यास मान्यता मिळाली तर २०२०-२१ मध्ये विधीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी शिक्षणाचा पर्याय उपलब्ध असेल. 

पुणे विद्यापीठाशी संलग्न विधी महाविद्यालयांमध्ये मराठीतून शिक्षण देण्यात यावे, याबाबत विद्या शाखेमध्ये चर्चा झाली आहे. आता हा प्रस्ताव विद्या परिषदेच्या बैठकीत ठेवला जाणार आहे. त्यास मान्यता मिळाल्यास २०२०-२१ मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठीतून उत्तरे लिहिता येतील.
- डॉ. अंजली कुरणे, अधिष्ठाता, मानवविज्ञान 

मराठीतून विधीचे शिक्षण मिळावे, ही खूप जुनी मागणी आहे. पण, त्याबाबत निर्णय झालेला नाही. विद्या शाखेने हा प्रस्ताव मंजूर केला आहे. विद्या परिषदेने मंजुरी दिल्यास विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल. 
- डॉ. विजय खरे, माजी अधिष्ठाता, मानवविज्ञान

विधी शिक्षणाचा लेखाजोखा 
१६ - पुणे जिल्ह्यातील महाविद्यालयांची संख्या  
४ - नगर जिल्ह्यातील संख्या  
५ - नाशिक जिल्ह्यातील संख्या  
१२ ते १३ हजार एकूण विद्यार्थिसंख्या  

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Proposal of Vidya Parishad in Marathi Law at Pune University