Agitation : पुण्यात पदवीधारकांचे आंदोलन; नेट-सेट धारकांचे अन्नत्याग

उच्च शिक्षण संचालक यांच्या कार्यालयासमोर संघर्ष समिती कडून ‘तुमची दिवाळी आमचं दिवाळं’ हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
NET SET Holders Agitation
NET SET Holders Agitationsakal

पुणे - प्राध्यापकांची शंभर टक्के भरती, तासिका तत्त्व धोरण बंद करणे, विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये कायमस्वरूपी पूर्णवेळ सहायक प्राध्यापकांची नियुक्ती आदी मागण्यांसाठी नेट, सेट, पीएच.डी धारक संघर्ष समितीच्या वतीने अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहेत. पुण्यातील उच्च शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर हे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा बुधवारी तिसरा दिवस होता.

उच्च शिक्षण संचालक यांच्या कार्यालयासमोर संघर्ष समिती कडून ‘तुमची दिवाळी आमचं दिवाळं’ हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. राज्य समन्वयक डॉ. प्रमोद तांबे सांगतात, ‘‘राज्यपाल यांनी लक्ष घालून प्रश्न सोडवावा यासाठी संघर्ष समिती २० ते २४ नोव्हेंबर या कालावधीत पुणे ते मुंबई अशी संघर्ष पदयात्रा काढण्यात येणार होती.

उच्च शिक्षितांच्या लालफितशाहीमुळे कुचकामी ठरलेल्या पदव्या राज्यपाल यांना विद्यापीठाचे कुलपती म्हणून साभार परत करण्यात येणार होत्या. मात्र, संघर्ष समितीच्या १५ समन्वयकांना पोलिस प्रशासनाकडून नोटीस बजावून मज्जाव करण्यात आला.’ त्यानंतर संघर्ष समितीने बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा आपला पवित्रा जाहीर करत आंदोलन पुढे सुरू ठेवले आहे.

आज आंदोलनाचा पाचवा व उपोषणाचा तिसरा दिवस असून शासन या प्रश्नासंदर्भात गंभीर दिसून येत नाही, असा दावा तांबे यांनी केला. अन्नत्याग केलेले प्रा.विकास गवई, डॉ. देवानंद गोरडवार व डॉ. भारत राठोड यांनी मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे मत व्यक्त केले.

प्रमुख मागण्या -

- राज्यात १०० टक्के प्राध्यापक भरती करणे

- तासिका तत्त्व (सीएचबी) धोरण बंद करुन ‘समान काम समान वेतन’ लागू करणे

- सुरू असलेली प्राध्यापक भरती गतिमान करून वेळेत पूर्ण करणे

- विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये कायमस्वरूपी पूर्णवेळ सहायक प्राध्यापकांची नियुक्ती करणे

सारथीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) संबंधीच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचे आंदोलन चालू आहे. कोल्हापूर येथे मागील २२ दिवसांपासून चालू असलेल्या बेमुदत साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात हे आंदोलन करण्यात आले.

पुणे विभागातील पुणे, नगर,नाशिक, सोलापूर येथून संशोधक विद्यार्थी मंगळवार (ता.२१) पासून आंदोलनास बसले आहे. यामध्ये संशोधक विद्यार्थी निखिल मगर, सौरभ शिंदे, ऋषिकेश लबडे, अर्जुन साळुंखे, स्वामी तिडमे, तुकाराम जाधव, तुकाराम शिंदे आदींचा सहभाग आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com