पुणेकरांच्या आरोग्यासाठी हजार कोटींची तरतूद

Municipal Budget
Municipal Budget

पुणे - कोरोनाच्या उद्रेकापासून धडा घेत अर्थसंकल्पात पुणेकरांच्या आरोग्यासाठी हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचे ऐतिहासिक पाऊल महापालिकेने उचलले. ऑस्ट्रियातील वॉमेड या संस्थेच्या निधीतून बाणेर येथे नानाजी देशमुख कॅन्सर रुग्णालय बांधण्याचे प्रस्तावित केले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील डॉ. कोटणीस दवाखान्यात सुपर स्पेशालिटी युरॉलॉजी हॉस्पिटलसाठी तरतूद केली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्रात भरीव तरतूद करतील, अशी अपेक्षा प्रशासनाकडून होती. मात्र, त्यात आयुक्तांनी ३१५ कोटींची तरतूद केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. आरोग्य व्यवस्थेच्या होत असलेल्या हेळसांडीकडे ''सकाळ''ने लक्ष वेधले होते. याची दखल स्थायी समितीने घेत महापालिकेच्या निधीतून आणि खासगी भागीदारीतून शहरातील आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यासाठी भरीव तरतूद केली आहे. 

ती पुढील प्रमाणे
पालिकेचे पहिले वैद्यकीय महाविद्यालय
पुणे महापालिकेचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट स्थापन केले आहे. महाविद्यालयात अध्यापकांची ६६ पदे भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली आहे. त्यासाठी १४६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

सुपर स्पेशालिटी युरॉलॉजी हॉस्पिटल
शुक्रवार पेठेतील डॉ. कोटणीस आरोग्य केंद्रात युरॉलॉजी आणि युरो सर्जरी अल्ट्रा मॉडर्न सेंटर उभारणार आहे. याच्या उभारणीसाठी ‘वामेड’चे सहकार्य आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

स्तन आरोग्य तपासणी कार्यक्रम
रुग्णाला स्पर्श न करता कर्करोग (कॅन्सर) बंदिस्त रूममध्ये, वेदनारहित आणि रेडिऐशनशिवाय स्तनाच्या कर्करोगाचे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि थरमोग्राफीवर आधारित स्क्रिनिंग पुणे महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आधुनिक तंत्रज्ञानाने हृदयरोग निदान
हृदय निदान आणि उपचारासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. त्यामध्ये इकोकार्डिओलॉजी, इको आणि कलर डॉप्लर या उच्च दर्जाच्या चाचण्यांचा समावेश आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात दोन कोटी रुपयांची तरतूद आहे.

पाचही विभागांत ‘आयसीयू’ सुविधा
कमला नेहरू रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू करण्यासाठी तरतूद केली होती. त्याच धर्तीवर महापालिकेच्या पाचही विभागांमधील रुग्णालयांत अतिदक्षता विभाग सुरू करण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यासाठी पाच कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे.

उपाध्याय अपघात विमा योजना
‘पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना’ नियमित निवासी मिळकत करदाते आणि गलिच्छ वस्ती निर्मूलन सेवा शुल्क भरणाऱ्यांना सहा लाख ७८ हजार ९० नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आहे. या योजनेची पुनर्रचना करण्यात आली आहे.

लेले दवाखाना अद्ययावतीकरण
शनिवारवाड्याजवळील पुणे महापालिकेच्या मुकुंदराव लेले दवाखान्याचे विविध प्रकारच्या वैद्यकीय सेवांसाठी अद्ययावतीकरण करणार आहे. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक अशा सर्वांवर योग्य पद्धतीने उपचार करता यावेत, विविध निदान चाचण्यांची सुविधा देता यावी, आवश्यकतेनुसार औषधोपचार करता यावेत आणि आवश्यक असणाऱ्या पायाभूत सोयीसुविधा आधुनिक पद्धतीने उपलब्ध करून देता याव्यात यासाठी विविध विकासकामे करणार आहेत. त्यासाठी अंदाजपत्रकात एक कोटी रुपयांची तरतूद केली.

आरोग्य वर्धन प्रकल्प
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी ‘आरोग्य वर्धन प्रकल्प’ ही योजना सुरू करण्याचे प्रस्ताविक केले. ज्यामध्ये केवळ उपचार न करता आरोग्य सुधारण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर कार्य करणार आहे. शहरातील १० लाखांहून अधिक नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. पुणे महापालिका, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक नागरिक यांच्या परस्पर सहयोगाने राबविण्यात येणाऱ्या या योजनेसाठी अंदाजपत्रकात पाच कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

नानाजी देशमुख कॅन्सर रुग्णालय
कॅन्सरवर उपचारासाठी एकही स्वतंत्र रुग्णालय शहर किंवा पश्चिम महाराष्ट्रात नाही. त्यामुळे महापालिकेच्या १० हजार चौरस मीटरहून अधिक जागेवर वारजे किंवा बाणेर येथे ‘नानाजी देशमुख कॅन्सर रुग्णालय’ बांधण्यासाठी प्रस्तावित केले आहे. त्यासाठी ऑस्ट्रियामधील ‘वामेड’ या संस्थेचे सहकार्य घेण्यात आले आहे. ही संस्था सुमारे ९०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहे. महापालिकेने त्यासाठी अंदाजपत्रकात एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

बिडकर रक्तपेढी अंतिम टप्प्यात
कमला नेहरू रुग्णालयात ‘मधुकर बिडकर रक्तपेढी’ची निर्मिती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. 

म्हाळगी हृदयरोग चिकित्सा सुविधा (बालकांसाठी)
‘स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी हृदयरोग चिकित्सा योजने’अंतर्गत कमला नेहरू रुग्णालयातील हृदयरोग विभागात नवजात अर्भक ते १२ वर्षे वयोगटातील बालकांसाठी हृदयरोग तपासणी केंद्र सुरू करणार आहे. त्यासाठी दोन इको डायग्नॉसिस तंत्रज्ञानाच्या अल्ट्रा साउंड मशिनचा वापर करणार आहे. या तंत्रज्ञानामुळे हृदयाचा आकार, जन्मतः बालकाच्या हृदयामधील दोष, हृदयाच्या स्नायूंची स्थिती, एका मिनिटात हृदयाची रक्त पंपिंग करण्याची क्षमता आदींची माहिती मिळते. 

नवीन कार्डिॲवक ॲम्ब्युलन्स
हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णांना ऑक्सिजनसह विशिष्ट प्रकारच्या विशेष उपचारांची गरज असते. त्यासाठी पुणे महापालिकेने दोन कार्डिॲवक ॲम्ब्युलन्स नुकत्याच खरेदी केल्या आहेत. रुग्णालयांची वाढती गरज लक्षात घेऊन आणखी दोन कार्डिॲवक ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देणार आहेत. त्यामुळे कार्डिॲवक ॲम्ब्युलन्सची संख्या चार होणार आहे.

मानसिक रुग्णांसाठी समुपदेशन केंद्र
‘कोविड-१९’मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत मानसिक रुग्णांची संख्या वाढली आहे. तसेच बदलती जीवनशैली आणि वाढत्या स्पर्धेमुळे मानसिक ताणतणाव निर्माण होत आहे. यासाठी नागरिकांना समुपदेशन करण्याची आवश्यकता आहे. ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’शी संलग्न असणाऱ्या व पुणे शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये मानसशास्त्राचे सुसज्ज विभाग आहेत. त्यांच्या सहकार्याने महापालिकेच्या वतीने मानसिक रुग्णांसाठी समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com