सार्वजनिक रुग्णालये, आरोग्यसुविधा बळकट करा

सार्वजनिक रुग्णालये, आरोग्यसुविधा बळकट करा
Published on: 

नवी दिल्ली,ता. २५ ः देशाच्या प्रगतीत सार्वजनिक संस्थांचे महत्त्वाचे योगदान अधोरेखित करत समाजातील वंचित घटकांसाठी सार्वजनिक रुग्णालये, आरोग्यसुविधा बळकट करण्याचे आवाहन माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की विशेषत: आरोग्य क्षेत्रातील भक्कम संस्था या लोकशाहीच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. परवडणाऱ्या दरातील वैद्यकीय सुविधांचा शोध घेणाऱ्या लाखो लोकांसाठी सार्वजनिक रुग्णालये एखाद्या जीवनवाहिनीप्रमाणे काम करतात. लोकशाहीतील कोणत्याही समाजासाठी संस्था आवश्यक असतात. मग त्या खासगी असो की सार्वजनिक. देशाला प्रगती करण्यासाठी व पुढे जाण्यासाठी संस्थांची गरज असते. आपण सध्या अस्तित्वात असलेल्या संस्थांना अधिक सशक्त केले पाहिजे. आरोग्याच्या क्षेत्रात रुग्णाची काळजी आणि कल्याणावर लक्ष्य केंद्रित करण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी, दिल्लीतील ‘युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्स’च्या ५५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना चंद्रचूड यांनी वैद्यकीय व्यवसायातील करुणा, माणुसकी आणि मानसिक आरोग्याचे महत्त्व यावर प्रकाशझोत टाकला. विद्यार्थी व डॉक्टरांना संबोधित करताना त्यांनी त्यांच्या कामाचे महत्त्व ओळखण्याचे आवाहन केले. विशेषत: त्यांच्या ज्या योगदानाकडे दुर्लक्ष होते,ते लक्षात घेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले,की रुग्णांशी माणुसकीच्या नात्याने वर्तन करणे हे वैद्यकीय सेवेत केंद्रस्थानी असले पाहिजे. या संस्थेतून तयार होणाऱ्या प्रत्येक डॉक्टरने आपण काहीतरी घडवत आहोत,हे माहीत नसतानाही आपल्या पाऊलखुणा मागे सोडल्या आहेत. आता तुमची वेळ असून तुमच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचे काम ते असेल,जे कोणालाही दिसणार नाही.

महात्मा गांधींवर ब्रिटिश डॉक्टरकडून शस्त्रक्रिया
महात्मा गांधी यांच्यावर पुण्यातील येरवडा तुरुंगात असताना १९२४ मध्ये ब्रिटिश डॉक्टरने शस्त्रक्रिया केली होती. ब्रिटिश सत्तेविरोधात देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणाऱ्या महात्मा गांधी यांच्यावर ब्रिटिश डॉक्टरने शस्त्रक्रिया केली. यावेळी ना रुग्णाचे राष्ट्रीयत्व आड आले ना डॉक्टरचे. ब्रिटिशांनीच त्यांना येरवडा तुरुंगात टाकले होते, ही वस्तुस्थितीही डॉक्टर व रुग्णाच्या नात्याआड येऊ शकली नाही, अशी आठवणही धनंजय चंद्रचूड यांनी सांगितली. डॉक्टरांनी रुग्णावर कोणताही पूर्वग्रह न ठेवता तसेच त्याचे सामाजिक स्थान, परिस्थिती लक्षात न घेता केवळ रुग्ण म्हणून उपचार केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com