
पुणे-पानशेत रस्त्यावरील धोकादायक पुलावर दुरुस्तीचे काम सुरू; सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा
सिंहगड : पुणे-पानशेत रस्त्यावरील सोनापूर गावच्या हद्दीत खचलेल्या पुलावर तात्पुरती दुरुस्ती करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. वर्षभर या कामाकडे दुर्लक्ष करत आलेला सार्वजनिक बांधकाम विभाग दै.'सकाळ'ने लक्ष वेधल्यानंतर खडबडून जागा झाला आहे. तसेच जिल्हा प्रशासनही सदर ठिकाणी दुर्घटना टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर लक्ष ठेवून असल्याची माहिती मिळत आहे.
पुणे-पानशेत रस्त्यावरील सोनापूर गावच्या हद्दीत असलेल्या पुलाला सुमारे पन्नास ते साठ मीटर लांब भेग पडली आहे. दोन दिवसांत पुलाचा नव्वद टक्के भाग मुळ जागेपासून एक ते दीड फूट खाली सरकला आहे. सध्या जोरदार पाऊस सुरू असल्याने सद्यस्थितीत कोणत्याही क्षणी हा पूल खाली खडकवासला धरणाच्या पाण्यात कोसळेल अशा अवस्थेत आहे. धक्कादायक म्हणजे या ठिकाणी पर्यायी रस्ता नसल्याने शेकडो वाहने याच धोकादायक पुलावरुन ये-जा करत आहेत.
'सकाळ'मधून बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पुल कोसळू नये म्हणून उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. पाणी शिरू नये म्हणून सिमेंट कॉंक्रिट टाकून भेग भरुन घेण्यात येत आहे. पुल सरकल्याने खालीवर झालेला भाग समतल करुन घेण्यात येत आहे मात्र जोरदार पाऊस सुरू असल्याने उशिराने जाग आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रयत्नांना कितपत यश मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अवजड वाहतूक बंद पुल धोकादायक स्थितीत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एस.टी. व पीएमपीच्या बसही बंद ठेवण्यात आल्या आहेत. स्थानिक व पर्यटकांची चारचाकी व दुचाकी वाहने मात्र पर्याय नसल्याने ये-जा करत आहेत. पर्यटकांनी शक्यतो या रस्त्यावरुन पानशेतकडे जाणे टाळावे असे आवाहन हवेली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे यांनी केले आहे.
"पावसाचे पाणी भेगेत शिरत असल्याने धोका वाढत आहे. त्यामुळे सिमेंट कॉंक्रिट टाकून भेग बुजवून घेण्यात येत आहे. तसेच खचलेला भाग समतल करुन घेण्यात येत आहे. कमी धोका असलेल्या एका बाजूनेच वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. सध्या पाऊस सुरू असल्याने नवीन काम करणे अशक्य आहे. पावसाळा कमी झाल्यानंतर तातडीने नवीन पूल उभारण्यात येणार आहे."
- अजय भोसले, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (दक्षिण).
Web Title: Public Works Department Bridge Of Pune Panshet Road Repair Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..