Pune Accident : सार्वजनिक बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा पुन्हा सर्वसामान्यांच्या जीवावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune accident

Pune Accident : सार्वजनिक बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा पुन्हा सर्वसामान्यांच्या जीवावर

किरकटवाडी: पुणे-पानशेत रस्त्यावरील खडकवासला धरणाला लागून डीआयएटी गेटजवळ अनेक दिवसांपासून पुलाचा भराव खचलेला असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळेत दुरुस्ती न केल्याने त्या ठिकाणी दुचाकी स्वाराचा अपघात झाला असून पुलाला जोरदार धडक बसल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. जगदीश वाघ (वय 35, रा. नांदेड गाव, सिंहगड रस्ता) असे जखमी व्यक्तीचे नाव असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डीआयएटीजवळ असलेल्या या पुलाचा भराव मागील दोन ते तीन महिन्यांपूर्वी खचलेला आहे. रस्ता खचलेल्या ठिकाणी सिमेंटच्या मोकळ्या गोण्यांमध्ये माती भरुन रस्त्यात ठेवण्यात आलेल्या आहेत. परिणामी अगोदरच अरुंद असलेला रस्ता अधिकच अरुंद झाला आहे. सदर पुलाचे प्रस्तावित असलेले कामही अनेक दिवसांपासून रखडलेले आहे. परिणामी सदर ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत.

जगदीश वाघ हे दुचाकीवरून सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास डोणजेकडे जात असताना पूल खचलेल्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या सिमेंटच्या पोत्यावरुन त्यांची दुचाकी उडाली व पुलाला जोरदार धडक बसली. धडकेमुळे वाघ गंभीर जखमी होऊन अत्यवस्थ स्थितीत रस्त्यावर पडले होते. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रक्तस्राव सुरू होता. खानापूर गावचे ग्रामपंचायत सदस्य सुधाकर गायकवाड व इतरांनी रुग्णवाहिका बोलावून वाघ यांना उपचारांसाठी पाठवून दिले.

अतिशय धोकादायक ठिकाण आहे. अनेक दिवसांपासून भराव खचलेला असताना सार्वजनिक बांधकाम विभाग दुरुस्ती करत नाही. सर्वसामान्यांचं घर उध्वस्त होत आहे, ही जबाबदारी कोणाची?"

- सुधाकर गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य, खानापूर.

"सदर अपघाताबाबत अद्याप पोलीस ठाण्याला माहिती आलेली नाही. पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी जाण्यास सांगितले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याबाबत कळवणार आहे."

- सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे.

"सदर ठिकाणी तातडीने काम करुन घेण्यात येईल."

- आर.वाय. पाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.