Pune News : पुणे-पानशेत रस्त्यावरील 'त्या' धोकादायक पुलाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Public works department neglect of dangerous bridge on Pune-Panshet road

Pune News : पुणे-पानशेत रस्त्यावरील 'त्या' धोकादायक पुलाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

सिंहगड : पुणे-पानशेत रस्त्यावरील सोनापूर (ता. हवेली) गावच्या हद्दीत दोन वर्षांपूर्वी खचलेला पूल अधिकच खचत चालला असून सध्या एकाच बाजूने जीवघेणी वाहतूक सुरू आहे. 'पाऊस थांबल्यानंतर तातडीने नवीन पूल तयार करुन घेऊ' असे सांगून वेळ मारुन नेणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी पाऊस थांबून तीन ते चार महिने उलटून गेले तरी अद्याप या धोकादायक पूलाकडे फिरकलेही नाहीत.

त्यामुळे पूल कोसळून मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार आहे का? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. मागील दोन वर्षांपासून सोनापूर गावच्या हद्दीतील पुणे-पानशेत या मुख्य रस्त्यावरील पूल खचत आहे. पाऊस सुरू असताना काही महिन्यांपूर्वी अचानक या पूलाला मोठी भेग पडली व सुमारे पन्नास मीटर लांबीचा पूलाचा अर्धा भाग दोन ते अडीच फूट खाली खचला.

त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय भोसले व मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी तात्पुरती उपाययोजना करुन एका बाजूने वाहतूक सुरू करुन घेतली व पावसाळ्यानंतर तात्काळ नवीन पूलाचे काम करुन घेण्यात येईल असे सांगण्यात आले, परंतु अद्याप सदर ठिकाणी कसलेही काम सुरू झालेले नाही. सध्या स्थानिक नागरिक, पर्यटक, नोकरदार या धोकादायक पूलावरुन जीव मुठीत धरून ये-जा करत आहेत.

अत्यंत धोकादायक ठिकाण....... ज्या ठिकाणी पूल खचलेला आहे ते अत्यंत धोकादायक ठिकाण आहे. चाळीस ते पन्नास फूट उंच कडा असून खाली खडकवासला धरणाचे पाणी आहे. एखादे अवजड वाहन जात असताना दुर्दैवाने पूल कोसळल्यास वाहन थेट खडकवासला धरणात पडण्याची शक्यता असून यामध्ये मोठी जीवितहानी होऊ शकते.

'सकाळ'चा पाठपुरावा........ मागील वर्षभरापासून सकाळ'ने या धोकादायक पुलाकडे सातत्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. परिसरातील नागरिकांच्या व्यथा सकाळ'ने सार्वजनिक बांधकाम विभागापर्यंत पोचविल्या आहेत. स्थानिक नागरिक, पर्यटक, नोकरदार अशा अनेकांच्या जीविताला धोका असल्याने नवीन पूलाचे काम तातडीने करुन घेण्याची मागणी लावून धरली आहे.

"सार्वजनिक बांधकाम विभाग या पूलाच्या कामाकडे दुर्लक्ष करुन नागरिकांच्या जिवाशी खेळत आहे. अगोदरचा पावसाळा गेला आता पुढचा पावसाळा जवळ येत आहे तरी प्रशासनाने कामाला सुरुवात केलेली नाही."

- सुरज पवळे, उपसरपंच, सोनापूर.

"जवळ जाऊन पाहण्याची भीती वाटते अशा स्थितीत सध्या पूल आहे. अधिकाऱ्यांनी समक्ष येऊन अनुभव घ्यावा म्हणजे गांभीर्य कळेल. पूल कोसळल्यास नाहक निष्पाप लोकांचा जीव जाईल व पर्यायी रस्ता नसल्याने जनजीवनही विस्कळित होईल. त्यामुळे लवकर काम करण्यात यावे."

- शरद जावळकर, माजी सरपंच, खानापूर.

"संबंधित अधिकाऱ्यांना सांगून लवकरात लवकर या पूलाचे काम करुन घेण्यात येईल."

- बाप्पा बहीर, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.