शालेय मुलांचे भावविश्‍व उलगडून दाखविणाऱ्या इंग्रजी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Book

शालेय मुलांचे भावविश्‍व उलगडून दाखविणाऱ्या ‘द ॲडव्हेंचर ऑफ लिटल कन्या - द सॉनिक रिव्हर्बिरेटर’ या इंग्रजी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन डॉ. फिरोदिया यांच्या हस्ते झाले.

शालेय मुलांचे भावविश्‍व उलगडून दाखविणाऱ्या इंग्रजी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन

पुणे - सध्याचे मोबाईलचे (Mobile) प्रस्थ निर्माण होण्यापूर्वी मुलांपुढे (Child) त्यांच्या सर्वांगिण विकासासाठीचे पुस्तक वाचन (Book Reading) आणि खेळ (Games) दोन भरभक्कम पर्याय होते. यातूनच मुलांचे जीवन (Child Life) घडायचे. परंतु आता मुलांमध्ये मोबाईल वापरण्याचे फॅड आले आहे. यामुळे त्यांनी पुस्तक वाचन सोडून दिले असून आजची मुले मोबाईलच्या आहारी गेली आहेत. परिणामी मुले सहानुभूती, साहस गमावून बसली आहेत. त्यातूनच ती हिंसक बनू लागली आहेत. मुलांची ही स्थिती चिंताजनक असल्याचे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. जयश्री फिरोदिया यांनी बुधवारी (ता.२०) येथे केले.

शालेय मुलांचे भावविश्‍व उलगडून दाखविणाऱ्या ‘द ॲडव्हेंचर ऑफ लिटल कन्या - द सॉनिक रिव्हर्बिरेटर’ या इंग्रजी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन डॉ. फिरोदिया यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी राज्याचे माजी पोलिस महासंचालक जयंत उमराणीकर, ज्येष्ठ पत्रकार अमित गोळवलकर, लेखिका अश्‍विनी साने आणि विश्‍वकर्मा पब्लिकेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

पुण्यातील विश्‍वकर्मा पब्लीकेशनच्यावतीने हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. यामध्ये मुलांचे भावविश्‍व उलगडून दाखविणाऱ्या कविता, चारोळ्या आणि छोट्या छोट्या गोष्टींचा समावेश आहे. डॉ. फिरोदिया पुढे म्हणाल्या, ‘‘ आमच्या लहानपणी आम्ही रामायण, महाभारत यासारखे पारंपारिक भारतीय साहित्याचे वाचन करत असायचो. यातून बौद्धिक क्षमता विकसित होत गेली. त्यातून सामंजस्य, सहानुभूती आणि आत्मविश्‍वास निर्माण होत असे. परंतु मोबाईलचा वापर वाढल्याने आता हे सर्व कालबाह्य झाल्यासारखे वाटू लागले आहे. शिवाय सध्याची मुले ही मोबाईलच्या पूर्ण आहारी गेल्याने त्यांचे पुस्तक वाचन बंद झाले आहे. यातूनच ते सहानुभूती, मित्रांमध्ये मिसळणे, खेळ खेळणे विसरू लागले आहेत. परिणामी मुलांमध्ये एकलकोंडेपणा, चिडचिड आणि हिंसक प्रवृत्ती वाढू लागली आहे.’’

लेखिका साने या माजी पोलिस अधिकारी जयंत उमराणीकर यांच्या कन्या आहेत. पोलिस सेवेत असताना अनेक ठिकाणी बदल्या होत गेल्या. त्यामुळे प्रत्येक बदलीचे ठिकाण हे अश्‍विनीसाठी एक ॲडव्हेंचर होते. त्यातून तिच्यात साहसपणा आल्याचे जयंत उमराणीकर यांनी सांगितले. अमित गोळवलकर यांनीही मनोगत व्यक्त केले. लेखिका साने यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी पुस्तक लिहिण्यामागची भूमिका विशद केली. नूपुर जैन यांनी सूत्रसंचालन केले. सायली गोसावी यांनी आभार मानले.

Web Title: Publication Of An English Language Book On School Children

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top