उदंचन प्रकल्पांच्या क्षमतावृद्धीला वाव

उदंचन प्रकल्पांच्या क्षमतावृद्धीला वाव
Published on: 

नवी दिल्ली, ता. १९ ः देशात उदंचन जलविद्युत प्रकल्पांची (पंप्ड स्टोरेज) ३४५.३८ गिगावॉट क्षमता ओळखण्यात यश आले असून यापैकी केवळ ७.४३ गिगावॉटच कार्यरत आहे. त्यामुळे देशाच्या नवीकरणीय ऊर्जा क्षमतेचा वाढता विस्तार लक्षात घेता ही क्षमता वेगाने वाढविण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
‘पीआयबी’च्या माहितीनुसार देशात पंप्ड स्टोरेजचे ३२० प्रकल्प निश्चित करण्यात आले आहेत. त्यापैकी १५.८७ गिगावॉट ऊर्जेची संयुक्त क्षमता असणाऱ्या ११ प्रकल्पांचे बांधकाम सुरू आहे.
सौर व पवन ऊर्जेचा विस्तार झाल्याचे वीज साठवणुकीची गरज वाढली आहे. वीज निर्मितीतील चढ-उतारांचा समतोल राखण्यासाठी आणि विशेषतः संध्याकाळच्या वेळी वाढणारी विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी ही ऊर्जा साठवणूक महत्त्वाची ठरत आहे.
उदंचन जलविद्युत प्रकल्प हे एखाद्या मोठ्या बॅटरीप्रमाणे काम करतात. त्यात अतिरिक्त वीज वापरुन खालच्या जलाशयातील पाणी वरील जलाशयात पंपाद्वारे नेले जाते. विजेची मागणी वाढल्यानंतर टर्बाइन्सद्वारे सोडून वीजनिर्मिती केली जाते. मात्र, ही क्षमता विकसित करण्यासाठी भौगोलिक परिस्थिती, भूगर्भशास्त्र, पाण्याची उपलब्धता, पर्यावरणावरील परिणाम आणि वीज पारेषण जोडणी यांचे सविस्तर मूल्यांकन करणे आवश्यक आहे.
केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या (सीईए) आराखड्यानुसार, २०३५ ते २०३६ पर्यंत उदंचन प्रकल्पाची १००.८१ गिगावॉट अतिरिक्त क्षमता विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे, देशाची एकूण क्षमता १०५.५६ गिगावॉटपर्यंत पोहचेल. या प्रकल्पांच्या विकासाला चालना देण्यासाठी सरकारने पायाभूत सुविधांसाठी आर्थिक मदत, वीज पारेषण शुल्कातून सवलत आणि मंजुरी प्रक्रिया जलद करण्यासह विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.
देशाने २०३० पर्यंत ५०० गिगावॉट बिगर जीवाश्म इंधनाधारित वीज निर्मिती क्षमतेचे उद्दिष्ट ठेवले आहे. अतिरिक्त वीज साठवून अधिक मागणीच्या काळात तिचा पुरवठा करण्यात उदंचन जलविद्युत प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी अपेक्षा आहे.


देशाची वीज साठवणूक क्षमतेची गरज
७३.९३ गिगावॉट
उदंचन प्रकल्पाची साठवणूक क्षमता
२६.६९ गिगावॉट
बॅटरी ऊर्जा साठवणूक प्रणाली
४७.२४ गिगावॉट
(अंदाजे क्षमता २०३१-३२ पर्यंत)

उदंचन प्रकल्पांतील जलाशयाबाहेरील प्रकल्प
२५८
एकत्रित क्षमता
२८८.७१ गिगावॉट
सर्वाधिक क्षमतेच्या पश्चिम विभागाचा वाटा
१२९.७२ गिगावॉट
महाराष्ट्र
६७.३६ गिगावॉट
गुजरात
३३.३६ गिगावॉट
(स्रोत : केंद्रीय विद्युत प्राधिकरण)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com