
खडकवासला, भामा आसखेड धरणात पावसाच्या पाण्यासोबत मोठ्याप्रमाणात गाळ वाहून येत असल्याने त्याबाबत चिंता व्यक्त केली जाते.
पुणे : जलशुद्धिकरण प्रकल्पातून रोज २० टन गाळा काढला जातोय बाहेर
पुणे - खडकवासला, भामा आसखेड धरणात पावसाच्या पाण्यासोबत मोठ्याप्रमाणात गाळ वाहून येत असल्याने त्याबाबत चिंता व्यक्त केली जाते. पण हा गाळ केवळ धरणात साचून राहत नाही तर, पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांमधून थेट जलशुद्धीकरण केंद्रामध्ये येत आहे. पर्वती, वडगाव आणि भामा आसखेड तीन जलशुद्धीकरण केंद्रात रोज तब्बल २० ते २१ टन गाळ बाहेर काढून टाकला जातो. तर पावसाळ्यात हे प्रमाण ४२ टनापर्यंत जाते.
खडकवासला धरणात मोठ्याप्रमाणात गाळ वाहून येतो, काही वर्षांपूर्वी धरणातील गाळ बाहेर काढण्यासाठी मोहीम राबविली होती. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात डोंगर फोडून बांधकाम केल्याने मातीची धुप होत आहे. ही माती वाहून धरणात येत असल्याने गाळाचे प्रमाण वाढते. पुणे महापालिकेला खडकवासला धरण प्रकल्पातील चार धरणांसह, पवना, भामा आसखेड या धरणातून वर्षाला २२ टीएमसी पाणी पुरवठा होतो. तर रोज १६५० एमएलडी पाणी वापरले जाते. हे पाणी शहराच्या विविध भागात म्हणजे पर्वती, लष्कर, वारजे, वडगाव, भामा आसखेड येथील जलकेंद्रांमध्ये शुद्ध करून पुणेकरांना पुरवठा केला जातो.
पूर्वी पर्वती जलकेंद्रासाठी कॅनॉलमधून पाणी सोडले जात, ते पर्वती येथे मोटारने पिंपींग करून मग जलशुद्धीकरण करत होते. मात्र, गेल्या चार वर्षापासून थेट धरणातून जलवाहिनीतून पाणी आणले जात आहे. त्यामुळे पाण्याची गळती व प्रदूषण कमी झाले आहे. धरणातील पाणी शुद्धीकरण केंद्रात आल्यानंतर त्यासोबत मोठ्याप्रमाणात गाळही असतो. जुन्या जलशुद्धीकरण केंद्रात हा गाळ पाण्यातून वेगळा केल्यानंतर तो थेट मलःवाहिनीत सोडून दिला जातो. पण नवीन पर्वती, वडगाव व भामा आसखेड या तीन जलशुद्धीकरण केंद्रावर गाळ पूर्णपणे बाजूला काढून त्याचा इतर ठिकाणी वापर करण्यासाठीची व्यवस्था आहे. यामध्ये पर्वती जलकेंद्रात रोज १२ टन, वडगाव केंद्रात ६ टन आणि भामा आसखेड केंद्रात २.५ टन गाळ बाहेर काढला जातो.
अशी केली जाते प्रक्रिया
बंद जलवाहिनीतून शुद्धीकरण केंद्रात पाणी आल्यानंतर पहिल्याच टप्प्यात क्लोरिन टाकून पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू केली जाते. त्यानंतर हे पाणी विविध पद्धतीने जलकेंद्रात फिरवून त्यातील माती, कचरा, इतर सुक्ष्म घटक बाजूला केले जातात. नवीन तंत्रज्ञानानुसार पाण्यातील गाळ पूर्णपणे वेगळा करता येतो. तो एका ठिकाणी एकत्र करून ट्रकमध्ये भरून शेतकऱ्यांना दिला जातो. खतामध्ये हा गाळ मिश्रित करून तो शेतीत वापरला जातो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘खडकवासला, भामा आसखेड धरणातून पुणेकरांना बंद जलवाहिनीतून पाणी पुरवठा केला जातो. हे पाणी जलशुद्धीकरण करताना शास्त्रीय पद्धतीचे तंतोतंत पालन होते, त्यामुळे नागरिकांना १०० टक्के शुद्ध पाणी मिळते. नव्या शुद्धीकरण केंद्रात गाळ बाजूला काढण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. हा गाळ शेतीसाठी वापरला जातो.’
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पाणी पुरवठा
जलशुद्धीकरण प्रकल्प व बाहेर पडणारा गाळ (पावसाळ्यातील गाळ)
पर्वती ५०० एमएलडी - १२ टन (२५ टन)
वडगाव २५० एमएलडी- ६ टन (१२ टन)
भामा आसखेड १२५ एमएलडी - २.५ टन ( ५ टन)
एकूण - २०.५ टन (४२ टन)