
शिरूर : ३६५ दिवसांची शाळा म्हणून राज्यात लौकीक निर्माण केलेल्या जिल्हा परिषदेच्या कर्डेलवाडी (ता. शिरूर) येथील आदर्श शाळेच्या या अद्भूत कामाची दखल, नवी दिल्ली येथील राष्ट्रीय शिक्षण, प्रशिक्षण व संशोधन परिषदेने (एनसीईआरटी) घेतली असून, या परिषदेचे पथक कर्डेलवाडी शाळेच्या 'वर्षभर शैक्षणिक कार्य' या अफलातून पॅटर्न चा अभ्यास करणार आहेत.
'एनसीईआरटी' च्या शैक्षणिक सर्वे विभागाच्या प्रमुख इंद्राणी भादुरी यांनी या सर्वेसाठी राज्याचे शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्याकडे परवाणगी मागितली असून, संस्थेचे प्रतिनिधी डॉ. विशाल पजानकर यांच्या नेतृत्वाखालील २५ ते तीस शिक्षण तज्ज्ञांचे पथक महिनाभर या शाळेचा, येथील शैक्षणिक स्थितीचा, उपक्रमांचा अभ्यास करणार आहे.
या सर्वेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच; शाळेत राबविले जाणारे शैक्षणिक व शिक्षणेतर उपक्रम, शिक्षकांकडून राबविली जाणारी शिक्षण पद्धती, पालकांचा शैक्षणिक कार्यातील सहभाग, परिसरातील स्वयंसेवी व सामाजिक संस्थांकडून शाळेतील उपक्रमांस मिळणारे पाठबळ, माजी विद्यार्थ्यांचे शाळेविषयीचे दायित्व याबाबत बारीक सारीक माहितींच्या नोंदी घेतल्या जाणार असल्याची माहिती शिक्षण (प्राथमिक) उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी दिली. या अभ्यासाचा एकत्रित अहवाल संस्थेकडून केंद्र शासनाला सादर केला जाणार असून, त्यातून शिक्षण क्षेत्रात काही सार्वत्रिक बदल व सुधारणा होण्याचा अंदाज शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त केला गेला आहे.
सन २००१ ला उपक्रमशिल व कल्पक शिक्षक दत्तात्रेय सकट व राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या आदर्श शिक्षिका बेबीनंदा सकट या शिक्षक दांपत्याची बदली कर्डेलवाडी च्या शाळेत झाली तेव्हा तेथे शिक्षणाबाबत उदासिनता होती. चाळीस विद्यार्थी संख्या असलेल्या या शाळेची इमारत मोडकळीस आलेली तर छप्पर गळके असे चित्र होते. परिसरातील अस्वच्छ वातावरण, शाळेला खेळाचे मैदान नाही, शाळेत कुठल्याही भौतिक सुविधा नाहीत, वीज, पिण्याचे पाणी, शौचालय व फर्निचर नाही, अशी प्रतिकूल स्थिती होती.
गुणवत्ता दर्जा 'ड' असलेल्या या शाळेतील हाताच्या बोटावर मोजता येईल, एवढ्याच विद्यार्थ्यांना लिहिता - वाचता येत होते. सकट दांपत्याने या संकटाचे संधीत रूपांतर करताना चारच महिन्यात शाळेचे रूपरंग बदलले. इमारतीची रंगरंगोटी केल्यानंतर परिसरात रंगीबेरंगी फुलझाडे लावली. विद्यार्थ्यांसाठी स्वखर्चाने शौचालय बांधले. शालेय गुणवत्तेत परिपूर्णता येण्यासाठी सकाळी आठ ते सायंकाळी सहा अशी शाळेची वेळ ठेवली. शिष्यवृत्ती, प्रज्ञाशोधच्या तयारीसाठी अधिकचे मार्गदर्शन केले. स्वयंअध्ययन, स्वयंशिस्त व स्वच्छता या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केल्यानंतर विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढत गेला.
हा आत्मविश्वास जागता ठेवताना प्रगत तंत्रज्ञानाद्वारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक परिघात खिळवून ठेवण्यासाठी व आनंददायी शिक्षण व्हावे यासाठी सन २००२ पासून 'डिजीटल एज्युकेशन सिस्टीम' सुरू केली. चित्रफिती तयार करून दृकश्राव्य साधनांदवारे अध्यापन सुरू केले. शाळेचे बदललेले रूप व प्रगती पाहता पालकांचीही शिक्षणातील अभिरूची वाढीस लागली व पालकांचा शैक्षणिक कार्यात सर्वतोपरी सहभाग वाढत गेला. त्यातूनच विद्यार्थ्यांचे चावडी वाचन या उपक्रमादवारे पालक व ग्रामस्थांसमोर शैक्षणिक मोजमाप होऊ लागले आणि मागे पडू पाहणा-या विद्यार्थ्यांवर शिक्षक - पालकांचे आपोआपच लक्ष वाढत गेले.
त्यातून सर्व मुले एकाच गुणवत्तेत आणण्याकामी हातभार लागला. शिक्षणाबरोबरच; गीतगायन, नृत्य, चित्रकला, हस्तकला, खेळ, सामान्यज्ञान या बाबींवर भर देऊन सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग अनिवार्य केल्याने मुलांचा आपोआपच रस वाढत जाऊन शंभर टक्के उपस्थिती टिकविण्यात शाळेला यश आले.
सन २००४ ला शाळेला जिल्हा परिषदेचा आदर्श शाळा पुरस्कार मिळाल्यानंतर शाळेची सर्वंकष घोडदौड सुरू झाली. दरम्यान, प्रज्ञाशोध व शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेच्या शंभर टक्के निकालाबरोबरच; विद्यार्थ्यांनी प्रज्ञाशोध व शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा व राज्य पातळीवर यश मिळविल्याने गावात शाळेविषयी आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण होऊन ग्रामस्थांचा शाळेच्या उपक्रमातील सहभाग वाढत गेला.
शाळेला भौतिक सुविधा पुरविण्यात पालकांबरोबरच ग्रामस्थांनीही पुढाकार घेतला. सन २००६ ला शाळेला जिल्हा परिषद अध्यक्ष चषकाने; तर केंद्र शासनाने गावाला 'निर्मल ग्राम' म्हणून गौरविले. अर्थात गावाच्या या लौकीकातही शाळेचा सहभाग महत्वाचा ठरला. सार्वजनिक स्वच्छतेकामी विद्यार्थ्यांनी मोठे योगदान दिले. २००६ च्या सर्वांगिण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमातही शाळा राज्यात अव्वल ठरली.
शाळेत राबविले जाणारे उपक्रम : सुंदर व एकसारखे हस्ताक्षर, स्वयंअध्ययन, पालक प्रशिक्षण, ग्रामसफाई, विविध स्पर्धा परीक्षा तयारी, आरोग्यतपासणी, वनौषधी लागवड, क्षेत्रभेटी, सणसमारंक्ष व उत्सव साजरे करणे, राज्यातील शाळांना गुणवत्तेसाठी मार्गदर्शन, आनंद मेळावे, ई लर्निंग कार्यक्रम, अवांतर वाचन, शाळा वर्ग सजावट, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, सहशालेय विविध स्पर्धा, स्नेहसंमेलन, स्नेहभोजन, पीक पाहणी व निरीक्षण, बीज संकलन, विद्यार्थी संवादयात्रा, कॅमेरा प्रशिक्षण, तंत्रज्ञान ओळख, गणिती विज्ञान भाषा कोडी, प्रेरणा अभियान, चित्र रांगोळी प्रदर्शन, आदर्श पालक सन्मान योजना, गरजूंना आर्थिक मदत, योगा व मेडिटेशन.
केवळ शैक्षणिक प्रगतीवर निर्भर न राहता विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, शिक्षणेतर उपक्रमातून त्याचे व्यक्तिमत्व घडावे यासाठी गेल्या वीस वर्षांपासून अनेकविध उपक्रम शाळेत राबविले जातात, अशी माहिती मुख्याध्यापक दत्तात्रेय सकट यांनी दिली. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास केंद्रबिंदू मानून काम करताना आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष केंद्रीत करतो व विविध उपक्रमांद्वारे भावनिक व सामाजिक विकास साधताना हिम्मत, हुनर व हौसला निर्माण करण्यासाठी सर्वस्वी योगदान देतो, असे राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या आदर्श शिक्षिका बेबीनंदा सकट यांनी सांगितले.