पुणे : गंभीर गुन्हे करुन दहशत पसरविणाऱ्या टोळीवर "मोका'नुसार कारवाई

दगडफेक व नागरीकांच्या वाहनांची तोडफोड करुन दहशत निर्माण करणाऱ्या एका टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोका) कारवाई करण्याचे आदेश अमिताभ गुप्ता यांनी दिले.
Amitabh Gupta
Amitabh GuptaSakal
Summary

दगडफेक व नागरीकांच्या वाहनांची तोडफोड करुन दहशत निर्माण करणाऱ्या एका टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोका) कारवाई करण्याचे आदेश अमिताभ गुप्ता यांनी दिले.

पुणे - चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दगडफेक व नागरीकांच्या वाहनांची तोडफोड करुन दहशत निर्माण करणाऱ्या एका टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोका) कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले. संबंधित टोळीविरुद्ध यापुर्वीही खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी असे विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल होते.

टोळीप्रमुख यश दत्ता हेळेकर (वय 21), शुभम शिवाजी खंडागळे (वय 21), विनायक गणेश कापडे (वय 20), साईनाथ विठ्ठल पाटोळे (वय 23, सर्व रा. एसआरए इमारत, विमाननगर) असे "मोका'नुसार कारवाई झालेल्या टोळीतील गुन्हेगारांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेळेकर व त्याच्या साथीदारांविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, लुट, वाहनांची चोरी, खंडणी, जबरी चोरी व मारहाण यांसारखे गंभीर गुन्हे दाखल होते. चतुःशृंगी पोलिसांकडून त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करुनही हेळेकर व त्याच्या साथीदारांच्या वर्तवणुकीत फरक पडत नव्हता.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून त्यांच्याकडून चतु:शृंगी परिसरात दगडफेक करण्याबरोबरच वाहनांची तोडफोड करण्याचे प्रकार केले जात होते. त्यांच्या या गुन्ह्यांमुळे नागरीकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे काम केले जात होते. त्यांच्या वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चतु:शृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) दादासाहेब गायकवाड यांनी हेळेकर टोळीविरुद्ध "मोका'अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला. संबंधित प्रस्ताव परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांच्यामार्फत अतिरिक्त पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे पाठविण्यात आला. त्यानुसार, हेळेकर टोळीविरुद्ध "मोका'नुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.

पोलिस आयुक्तांची 83 टोळ्यांविरुद्ध "मोका'ची कारवाई

शहरातील गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांवर जरब बसविण्यासाठी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आत्तापर्यंत तब्बल 83 टोळ्यांविरुद्ध "मोका'नुसार कारवाई केली आहे. मागील सहा महिन्यात 20 टोळ्यांवर गुप्ता यांनी "मोका' कारवाईचा बडगा उगारला आहे. याबरोबरच एमपीडीए व तडीपार कारवाईद्वारेही सराईत गुन्हेगारांवर वचक बसविण्यावर भर दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com