
पुणे : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह खासगी वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वाढणारा वापर, सौर ऊर्जेकडे वाढणारा कल यासह हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेकडून सुरू असलेल्या उपाय योजनांमुळे पुण्यातील हवा सुधारत आहे. चहूबाजूने शहर वाढत असताना ही पुण्याच्या दृष्टीने स्वागताहार्य बाब असल्याचा निष्कर्ष पुणे महापालिकेच्या २०२१-२२च्या पर्यावरण अहवालातून काढण्यात आला आहे. पुणे शहराचा २०२१-२२चा पर्यावरण अहवाल आज मुख्यसभेसमोर आयुक्त विक्रम कुमार यांनी सादर केला. यामध्ये शहरातील हवा, ध्वनी, जल, वृक्षसंपदा यासह इतर पर्यावरणाच्या घटकांचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. पुणे पुण्यातील नागरिक पर्यावरणाबाबत अधिक संवेदनशील होत असून शहरातील सौरऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यास प्राधान्य देत आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत शहरात इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीमध्ये चार ते सहा पटीने वाढ झाली आहे. नागरिकांनीही सौर ऊर्जेपासून 16.20 कोटी युनिट वीजनिर्मिती केली. विजेचे दर वाढल्यामुळे नागरिक सौर ऊर्जा युनिट बसवून त्याचा वापर करण्यास प्राधान्य देत आहेत, असे या पर्यावरण सद्यःस्थिती अहवालात नमूद केले आहे. एकीकडे इ वाहनांची खरेदी वाढत असताना दुसरीकडे सौर ऊर्जेचा वापर करण्यावर नागरिकांचा कल वाढत आहे. २०१९-२० मध्ये १२.१७ कोटी युनिट सौर ऊर्जेद्वारे वीज निर्मिती केली गेली. २०२०-२१ मध्ये एकूण १६.२० कोटी विद्युत युनिटची वीज निर्मिती झाली आहे. तर चालू २०२१- २२ या वर्षात ५८हजार २२८ नागरिकांनी सोलर वॉटर हिटर्स वापर केला आहे, असे अहवालात नमूद केले आहे.
२०२० या वर्षात पूर्णपणे लॉकडाऊन असल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले होते, २०२१ या वर्षात काही प्रमाणात लॉक डाऊन होते, पण व्यवहार पूर्वपदावर येत होते. तरीही २०२० च्या तुलनेत पुण्यातील हवा २०२१ मध्ये जास्त प्रदूषित झाली नाही. सूक्ष्म धूलिकण (पी.एम.१०) हे या वर्षभरात एकदाही वाईट व खूप वाईट या श्रेणीत गेली नसल्याने शहरातील हवा चांगली होती. २०२१ च्या ३६५ दिवसांपैकी १६३ दिवस शहरातील हवेची गुणवत्ता उत्तम होती,११४ दिवस समाधानकारक होती, तर ८८ दिवस हवेची गुणवत्ता मध्यम स्वरूपाची होती. २०१८, २०१९ च्या तुलनेत २०२० व २०२१ मध्ये उत्तम श्रेणीचे दिवस वाढले आहेत.
इलेक्ट्रीक गाड्यांची खरेदी सहा पटीने वाढली
पुण्यात २०२० मध्ये केवळ १ हजार ४५० इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली होती, २०२१ मध्ये यात त्यात ४.२८ टक्के वाढ झाली होऊन, ६ हजार २१९ वाहनांची नोंदणी झाली. तर २०२२ या वर्षात इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षात जेवढ्या गाड्या खरेदी केल्या, त्यापैकी जास्त गाड्या अर्ध्या वर्षात खरेदी केल्या आहेत. मे २०२२ पर्यंत पुणे आरटीओ कार्यालयात ८ हजार २२० वाहनांची नोंदणी झाली आहे, त्यामुळे हे डिसेंबर २०२२ पर्यंत ही संख्या मोठ्याप्रमाणात वाढणार आहे. २०२०च्या तुलनेत २०२२ मध्ये साधारणपणे ६ पटीने इ गाड्यांची खरेदी वाढल्याचे दिसून येत आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपी) ताफ्यातील डिझेल बस काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची जागा सीएनजी आणि इ बसने घेतली आहे. पीएमीपच्या ताफ्यातील २ हजार २५५ बसेस पैकी १ हजार ६५८ सीएनजी बस आहेत, तर ३१० ई बस आहेत. सध्या केवळ १२.३ टक्के बस डिझेलवर धावत आहेत.
‘‘कोवीडच्या काळात शहर ठप्प झाले होते, आता शहर पूर्ववत होत आहे तरीही प्रदूषणात फार वाढ झालेली नाही असे दिसून आलेले आहे. नागरिकांमध्ये इलेक्ट्रिक वाहन वापरण्याचा कल वाढत आहे. पेट्रोल डिझेलवरील वाहने बीएस सिक्स श्रेणीची वाढल्याने त्यांचे प्रदूषणही कमी होत आहे. शहराच्या पर्यावरणाच्या दृष्टीने हे एक स्वागतार्ह पाऊल आहे."
- मंगेश दिघे , पर्यावरण अधिकारी पुणे महापालिका
शहराची एकूण हद्द - ५१९ चौरस किलोमीटर
शहरातील उद्याने - २१०
हरित क्षेत्र - १९.७८ लाख चौरस मीटर
वृक्ष संख्या - ५१.०३ लाख
वाहनांची संख्या - ३३.२४ लाख
इलेक्ट्रिक वाहनांची संख्या- १५८८९
एलईडी दिव्यांची संख्या - १.८० लाख०२२ मे पर्यत ८ हजार २२०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.