

Pune News
esakal
पुणे: पुणे शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी शिवाजीनगर आणि पेठ परिसरात कमी प्रदूषण क्षेत्र (लो एमिशन झोन) लागू करण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत. या क्षेत्रात अधिक प्रदूषण करणाऱ्या वाहनांकडून विशेष प्रदूषण शुल्क आकारण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून, स्वच्छ हवा आणि आरोग्यदायी शहरासाठी सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शहरातील प्रदूषणाच्या वाढत्या धोक्यावर ‘सकाळ’ने वृत्तमालिकेद्वारे लक्ष वेधल्यानंतर प्रशासनाने या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात विविध तज्ज्ञ, संस्था व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्यासह वाहतूक नियोजन क्षेत्रातील तज्ज्ञ आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.