पुणे - तस्करांनी दुबई ट्रिपसाठी निघालेल्या तीन विद्यार्थ्यांचा वापर करून ट्रॉली बॅगमध्ये लपवून ठेवलेले सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे परकीय चलन पुणे विमानतळाच्या सीमाशुल्क विभागाने जप्त केले. या प्रकरणी दोघांना अटक केली असून, त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने १७ फेब्रुवारी रोजी दुबई ट्रिपसाठी निघालेल्या स्पाइस जेटच्या विमानातून दोन ट्रॉली बॅगमध्ये परकीय चलन भारतातून तस्करी केल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी त्या प्रवाशांना परत बोलावून घेतले. त्यांच्या सामानाची कसून तपासणी केली. अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या सामानातून तीन कोटी ४७ लाख रुपये (सुमारे चार लाख अमेरिकन डॉलर्स) जप्त केले.
चौकशीदरम्यान, विद्यार्थ्यांनी सीमाशुल्क अधिकाऱ्यांना सांगितले की, या बॅगा पुण्यातील ट्रॅव्हल एजंट खुशबू अग्रवाल यांनी दिल्या होत्या. खुशबू अग्रवाल हिने या तीन विद्यार्थ्यांना त्यांच्या दुबई ट्रिपसाठी पॅकेज दिले होते. पुण्याहून निघण्यापूर्वी शेवटच्या क्षणी तिने विद्यार्थ्यांना दोन बॅगा दिल्या.
त्यामध्ये कार्यालयीन कागदपत्रे असून, ती दुबईच्या कार्यालयात तातडीने द्यावयाची असल्याचे सांगितले. चांगल्या हेतूने या विद्यार्थ्यांनी बॅगा घेऊन पुण्याहून निघून गेले. परंतु तस्करीची माहिती मिळताच सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी अधिकाराचा वापर करून त्या प्रवाशांना दुबईवरून परत बोलावून सामानाची झडती घेतली.
या प्रकरणी पुणे विमानतळाच्या एअर इंटेलिजेंस युनिटच्या अधिकाऱ्यांनी ट्रॅव्हल एजंट खुशबू अग्रवाल हिला अटक केली. तिने जबाबात या परकीय चलनाची मालकी स्वीकारली. तपासादरम्यान, शोध पथकाने परकीय चलन पुरविणाऱ्या महम्मद आमीर यालाही अटक केली.
त्याच्या फर्मची झडती घेतली असता, विविध देशांचे ४५ लाख रुपयांचे परकीय चलन आढळले. पुणे, मुंबईच्या एअर इंटेलिजेंस आणि कस्टम्स अधिकाऱ्यांनी पुणे, अहमदाबाद आणि मुंबई येथील १० ठिकाणी छापे टाकले. खुशबू अग्रवाल आणि आमीर यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.
न्यायालयाने दोघा आरोपींना सहा दिवसांची कोठडी ठेवण्याचे आदेश दिले. त्यानंतर न्यायालयाने २४ फेब्रुवारीला दोघा आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत असल्याची माहिती पुणे सीमाशुल्क विभागाकडून देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.