...आता चऱ्होलीकरांना पिंपरी हाकेच्या अंतरावर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

या रस्त्याचे काम प्रगतिपथावर असून रस्त्यांतर्गत जलवाहिनी, जलनिस्सारण वाहिनी, भूमिगत विद्युत वाहिन्या टाकणे आदी कामे सुरू आहेत. काम पूर्ण होण्यास निविदा तारखेपासून १८ महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
- देवेंद्र बोरावके, स्थापत्य उपअभियंता

मोशी - पिंपरी- चिंचवडसाठी जवळचा मार्ग व्हावा, ही गेल्या अनेक वर्षांपासूनची चऱ्होलीतील नागरिकांची इच्छा आता पूर्ण होणार आहे. पुणे- आळंदी बीआरटीएस मार्ग ते खडी मशिन- अलंकापुरममार्गे पुणे- नाशिक महामार्गावरील स्पाइन रस्त्यापर्यंतच्या १८ मीटर रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रभाग क्रमांक ३ चऱ्होली येथील चोविसावाडी वडमुखवाडीतील सर्व्हे क्रमांक १४९ ते १५७ मधून जाणारा १ हजार ३२० मीटर लांबीचा व १८ मीटर रुंदीचा प्रशस्त व अद्ययावत रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. या रस्त्यामुळे चऱ्होलीतील नागरिकांना पिंपरी- चिंचवड शहर आता हाकेच्या अंतरावर येणार आहे. कारण पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेमध्ये चोविसावाडी, वडमुखवाडी भाग येण्याअगोदर मोशी उपनगर किंवा भोसरीमार्गे सुमारे चार- पाच किलोमीटरचा वळसा घालून चऱ्होली उपनगराला जावे लागत असे. आता मात्र स्पाइन रोड, वखार महामंडळ चौक, खडी मशिन, गायत्री मंदिर, अलंकापुरममार्गे पुणे- आळंदी बीआरटी मार्गापर्यंत हा १८ मीटरचा रस्ता तयार होत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने पदपथ, मध्यभागी दुभाजक अशा पद्धतीने अद्ययावत रस्ता असेल. हा रस्ता विकसित होत असल्यामुळे चऱ्होली ते पिंपरी- चिंचवड शहर यादरम्यान विविध कामांसाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. या कामासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी माजी महापौर नितीन काळजे, लक्ष्मण सस्ते, सुवर्णा बुर्डे, विनया तापकीर आदी पाठपुरावा करत आहेत. या कामाची निविदा १९ कोटी ४७ लाख १२ हजार २२८ रुपये अशा रकमेची काढण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत या कामासाठी ७५ लाख रुपये खर्च झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune alandi brt road to pune road work